निवडणुकात जनता भाजपला गाडून टाकणार

फलटण ः राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करताना रणजितसिंह नाईक-निंबाळकर शेजारी विजय पाटील, धैर्यशील जाधव आदी.

राधाकृष्ण विखे-पाटील यांची पत्रकारांशी बातचीत
फलटण, दि. 5 (प्रतिनिधी) – केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेचा पूर्णपणे विश्‍वासघात केला आहे. जातीपातीचे राजकारण करुन विकासाच्या मुद्यापासून भरकवटण्याचे काम केले आहे. राज्यात सनातनी आणि जातीयवादी विचारसरणी जोपासण्याचे काम करणाऱ्या भाजपा सरकारचा पापाचा घडा भरला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जनता भाजपा सरकारला गाडून टाकेल, असा विश्‍वास विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्‍त केला.
राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संघर्षयात्रेनिमित्त म्हसवडला सभा करुन ते विश्रांतीसाठी फलटण येथील शासकीय विश्रामगृहावर आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रांतिक सदस्य जयकुमार शिंदे, राष्ट्रीय कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम शिंदे, मितेश खराडे, लतिफभाई तांबोळी, मनसेचे उपजिल्हाप्रमुख युवराज शिंदे, राजेंद्र नागहिळे आदी उपस्थित होते.
देशात व राज्यात सध्या विचार मारण्याचे काम सुरू आहे. कोणी काय खावे, कोणी काय बोलावे हे सरकार ठरवत आहे. विचारवंतांच्या हत्या ही देशाला लागलेला काळिमा आहे. कर्नाटक सरकारच्या एटीएसने कलबुर्गी यांच्या हत्येचे धागेदोरे शोधून काढले. यात सनातनचा बुरखा फाडल्यावर राज्यातील एटीएस व पोलिसांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येतील मारेकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. इतके दिवस हे काय झोपले होते का असा सवाल राधाकृष्ण विखे -पाटील यांनी केला.
भिमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी संभाजी भिडेगुरुजी व मिलिंद एकबोटे यांच्यावरही कारवाई करण्यास राज्य सरकारने टाळाटाळ केली. न्यायालयाने एकबोटेंचा जामिन फेटाळल्यानंतर पोलिसांनी अटक केली. या सगळ्या गोष्टीवरुन हे स्पष्ट होते की जातीयवादी आणि सनातनी विचार जोपासण्याचे आणि जातीपातीमध्ये भांडणे लावण्याचे काम राज्य सरकार करत असल्याचा आरोप विखे-पाटील यांनी केला.
देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. रोजगाराबाबत सरकार फसव्या घोषणा करीत असून नोटाबंदी आणि जीएसटीमुळे छोटे-मोठे व्यापारी देशोधडीला लागले आहेत. देशात व राज्यात जनता अडचणीत येवू लागली आहे. पेट्रोल व डिझेल, गॅस दरवाढीचा जोरदार फटका सामान्य जनतेला बसत आहे. आमच्या काळात जनतेची कामे होत होती. मात्र, आता कामे करण्याची केवळ आश्‍वासने दिली जातात. त्याला जनता कंटाळली आहे. सरकार वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे, असे ते म्हणाले.
राज्यात राष्ट्रीय कॉंग्रेसच्यावतीने काढलेल्या संघर्ष यात्रेत जनतेचे प्रश्‍न आम्ही उचलून धरीत आहोत. आम्ही काय केले व भाजपा सरकारने काय केले याचा लेखाजोखा मांडत आहोत. जनतेपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून जनतेतून कॉंग्रेसच्या संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कॉंग्रेस कार्यकर्तेही यात्रेच्या निमित्ताने कामाला लागले आहेत असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील शासकीय विश्रामगृहावर येताच प्रशासनाच्यावतीने तहसीलदार विजय पाटील, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्यावतीने विखे -पाटील यांचे स्वागत रणजितसिंह नाईक-निंबाळकर, जयकुमार शिंदे, तुकाराम शिंदे यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)