कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांकडून बंदचे आवाहन

सातारा – इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी भारत बंदच्या पार्श्वभूमीवर तब्बल 4 वर्षानंतर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी एकत्र येत सातारा जिल्ह्यात नागरिकांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच आगामी निवडणुकांमध्ये पक्षश्रेष्ठी आदेश देतील त्याप्रमाणे काम करावे लागणार असून कोणत्याही परिस्थितीत बंडखोर उमेदवारांना मदत होणार नसल्याचे कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष विजयराव कणसे यांनी सांगितले.

रविवारी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कणसे यांनी माहिती दिली. त्यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.आनंदराव पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ.पाटील म्हणाले, सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येवून भारत बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. बंदमुळे नागरिकांना त्रास होवू यासाठी अत्यावश्‍यक सेवा तसेच शाळा वगळण्यात आल्या आहेत. सकाळपासून दुपारी 4 पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन आम्ही करीत असून इंधन दरवाढीमुळे हैराण झालेली जनता निश्‍चितपणे बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी सुनील माने यांनी सरकारच्या कर्जमाफी, नोटबंदीवरून टीका केली.

 आमचा तो बाब्या आता गेलाय
भाजपवर टीका करताना कॉंग्रेसच्या कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नसल्याच्या मुद्‌द्‌यावरून आ. पाटील यांना विचारले असता त्यांनी सुरुवातीला सारवासारव करत ते म्हणाले शेतकऱ्यांचे पैसे देण्याची त्यांची भूमिका आहे, त्यांनी थोडी वेळ मागितली आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर पत्रकारांनी कॉंग्रेसची ही भूमिका म्हणजे आपला तो बाब्या… या म्हणीप्रमाणे असल्याचे निदर्शनास आणून देताच आ. पाटील यांनी, आमचा तो बाब्या आता गेलाय असे सांगूनच टाकले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)