परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी झाली सुरू
मुंबई – जागतिक बाजारात मंगळवारी तेलाचे दर कमी झाल्यानंतर रुपयाच्या मूल्यातही सुधारणा झाली. त्याचबरोबर महागाई कमी झाल्याची आकडेवारी काल सरकारने सादर केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे शेअरबाजार निर्देशांक बरेच वाढले. जागतिक वातावरण खराब असूनही भारतीय शेअरबाजार निर्देशांक मात्र वाढल्याचे दिसून आले.
तेल कंपन्या, पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपन्या आणि बॅंकांच्या शेअरची आज जास्त प्रमाणात खरेदी झाल्याचे दिसून आले. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे रुपयाचे मूल्य गेल्या दिवसात बऱ्यापैकी वाढले आहे. आता ते फार कमी होण्याची शक्यता असल्याचे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजारात गुंतवणूक करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
काल शेअरबाजार निर्देशांक कमी होऊनही या गुंतवणूकदारांनी 832 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनीं मात्र 1073 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची माहिती शेअरबाजारांनी जारी केली आहे. जर परदेशी गुंतवणूकदारांनी खरेदी चालू ठेवली तर निर्देशांकांना चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे
मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 331 अंकांनी म्हणजे 0.95 टक्क्यांनी उसळून 35144 अंकांवर बंद झाला. तर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 100 अंकांनी वाढून 10582 अंकांवर बंद झाल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसात सेन्सेक्स 425 अंकांनी कमी झाला होता. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता खरेदी करीत असल्याचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्याचा रुपयाला आधार मिळू लागला आहे. दुपारी रुपयाचे मूल्य 37 पैशांनी वाढल्यानंतर खरेदीचा जोर वाढला. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून वाढत असलेले क्रुडचे दर आज एक टक्क्याने कमी झाले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा