निळोबाराय मंदिरापासून दुसऱ्या दिंडीचे प्रस्थान केल्यास आत्मदहन

अशोक सावंत यांचा इशारा : पिंपळनेर संत निळोबाराय दिंडीचा वाद
पारनेर – संत निळोबारायांच्या समाधी मंदिरापासून देवस्थानशिवाय कोणत्याही दिंडीस प्रस्थान करू दिले जाणार नाही. तसा प्रयत्न झाल्यास आपण आत्मदहन करू, असा इशारा संत निळोबाराय संस्थानचे कार्याध्यक्ष अशोक सावंत यांनी दिला.
बुधवारी पिंपळनेर (ता. पारनेर) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संत निळोबारायांचे वंशज, संस्थानचे इतर विश्‍वस्तही यावेळी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, संत निळोबाराय संस्थानच्या परवानगीने संत निळोबाराय सेवा मंडळाच्या सहायाने 1973 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कै. रामदासबुवा मनसुक यांच्या नेतृत्वाखाली, देवस्थानचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे व बबनराव गाजरे यांच्या व्यवस्थापनाखाली निळोबारायांच्या दिंडीस प्रारंभ झाला. 1978 मध्ये सोपान औटी महाराज वारकरी म्हणून या दिंडीत सहभागी झाले. तेव्हापासून औटी यांना दिंडी चालक, मालक म्हणून संस्थान, सेवा मंडळाने कधीही अधिकार दिलेला नव्हता. पुढील काळात रामदासबुवा मनसुक, बबनराव पायमोडे असे अनेक महाराज दिंडीत सहभागी झाले. परंतु आजवर सेवा मंडळ व गावकऱ्यांनीच दिंडीचे नियोजन केले. त्यामुळे दिंडीचा मार्ग बदलला हा निर्णय मान्य नसल्याचे सांगण्याचा सोपान औटी महाराजांना अधिकार नाही.
2017 मध्ये संस्थानच्या बैठकीत संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्याच्या धर्तीवर संत निळोबारायांचाही पालखी सोहळा असावा व तो नगर जिल्ह्यासाठी स्वाभीमानी सोहळा ठरावा असा निर्णय घेण्यात आला. या पालखी सोहळ्यासाठी देहू व आळंदी संस्थानने मदत केली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी हा सोहळा अतिशय दिमाखात पार पडला. शासनानेही पालखी सोहळ्याची दखल घेऊन सर्व शासकिय सुविधा पुरविल्या. पांडुरंगाच्या मंदिरात विणेकरी, नैवेद्याचा मानही देण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात पारंपरिक दिंडीतील सर्व वारकरी, विणेकरी, चोपदार सहभागी झाले.
देवस्थानची मालमत्ता खासगी आहे. तेथून निळोबारायांच्या नावाने कोणत्याही दिंडीचे प्रस्थान होऊ दिले जाणार नाही, असा ठरावही करण्यात आला आहे. असे असतानाही दिंडीचे प्रस्थान करण्याचा प्रयत्न झालाच तर आपण आत्मदहन करू, माझ्या मृतदेहावर पाय ठेऊन दिंडी पुढे न्यावी लागेल. तसे पत्रही प्रशासनास देण्यात आल्याचे सावंत म्हणाले.

देवस्थानच्या दिंडीत यंदा 51 दिंड्या सहभागी होणार
गतवर्षी एकूण 17 दिंड्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. यंदा 51 दिंड्या सहभागी होणार असून दिंडीतील सहभागी वारकऱ्यांची संख्या दहा हजारावर असेल. असे असताना ज्येष्ठ असलेल्या औटी महाराजांनी स्वतंत्र दिंडीचा आग्रह धरू नये, सन्मानाने पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, त्यांच्या दिंडीचा सर्व खर्च देवस्थान करेल, अशी विनवणी ग्रामस्थ तसेच विश्‍वस्तांनी केली. तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम असून ते निळोबांची पताका पंढरपूरला नेणारच, असे सांगत आहेत, असे सावंत म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)