निळू फुले नाट्यगृहावरुन मानापमान नाट्य

राष्ट्रवादीनेच उरकले उद्‌घाटन : अजित पवारांना डावलल्याचा संताप

पिंपरी – राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांची उद्‌घाटने करण्याचा भाजपने सपाटा लावला आहे. मात्र, या विकासाचे खरे शिल्पकार असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या उद्‌घाटन सोहळ्याला न बोलावल्याचा राग व्यक्त करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज (शनिवारी) पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहाचे उद्‌घाटन मुख्यमंत्री येण्याअगोदरच परस्पर उरकून टाकले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पिंपळेगुरव येथे नटसम्राट निळू फुले नाट्यगृह बांधले आहे. या नाट्यगृहाचे काम राष्ट्रवादीच्या काळात सुरू झाले होते. या नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी (दि. 12) दुपारी तीन वाजता भोसरीतून ई-उद्‌घाटन करण्यात येणार होते. मात्र, या उद्‌घाटनाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना बोलविण्यात आले नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजपचा निषेध करत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे व ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते उद्‌घाटन केले.

यावेळी मयुर कलाटे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, श्‍याम जगताप, शोभा अदियाल, तानाजी जवळकर, शिवाजी कर्डिले, श्वेता इंगळे आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अगोदर उद्‌घाटन केले म्हणून सांगवी पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते.

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप म्हणाले की, नाट्यगृहाचे काम न्यायालयीन कचाट्यात अडकले होते. मी स्वत: नगरसेवक असताना नाट्यगृहासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांच्याकडे पाठपुरावा करून काम पूर्ण केले आहे. नाट्यगृहाच्या कामाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले होते. तसेच, त्याचे कामही राष्ट्रवादीच्या काळात पूर्ण झाले आहे. भाजप राष्ट्रवादीच्या कामाचे दुसऱ्यांदा उद्‌घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, असेही जगताप म्हणाले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)