निळवंडे व भोजापूरवर दुष्काळी भागाचा हक्क

हरिश्‍चंद्र चकोर यांचा दावा; पाणी मिळवण्याचा विश्‍वास

संगमनेर – निळवंडे व भोजापूर धरणांचे पाणी दुष्काळी व पाण्यापासून वंचित विभागातील गावांमधील मंजूर लाभक्षेत्रास पाणी मिळणे, हा आमचा जन्म सिद्ध हक्क आहे. तो आम्ही सर्वांचे सहकार्याने व तरुण पिढी संघटित करून मिळवणारच, असा दावा निवृत्त अभियंता हरिश्‍चंद्र चकोर यांनी केला.
संगमनेर येथील संघर्ष सामाजिक संस्थेच्या वतीने पारेगाव खुर्द गावी आयोजित जनजागृती अभियानात ते बोलत होते. चकोर पुढे म्हणाले, की राज्यात समन्यायी पाणी वाटप कायदा लागू आहे. त्यानुसार भंडारदरा, निळवंडे, मुळा, आढळा व भोजापूर या सर्व धरणांचे दुष्काळी व पाण्यापासून वंचित पाणलोट व लागवडीयोग्य क्षेत्राला प्राधान्याने पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देणे अपेक्षित व गरजेचे आहे; मात्र निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे आवश्‍यक भूसंपादन झालेले असताना, केंद्रीय जल आयोगाची मान्यता, पुरेसा निधी उपलब्ध असतानादेखील सुरू झालेली नाहीत. महत्त्वाचे म्हणजे धरणात गेल्या 3 ते 4 वर्षांपासून जवळपास पूर्ण ( आठ हजार दशलक्ष घनफूट) पाणीसाठा करण्यात येत असून आजपावेतो प्रवाही सिंचनाद्वारे एकही गुंठा क्षेत्र भिजवले गेले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील जनतेमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
निळवंडे धरणाच्या मुख्य भिंतीचे काम येथील राज्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी व अभियंत्यांनी आदर्श पुनर्वसनासहित पूर्ण केले आहे. या भागातील जनतेला त्याचा सार्थ अभिमान आहे; परंतु अकोले तालुक्‍यातील कालवे पूर्ण नसल्यामुळे पाणी केव्हा बाहेर पडणार, याकडे लाभक्षेत्रातील शेतकरी डोळे लावून बसले आहेत. संबंधित सर्व लोकप्रतिनिधी व जलसंपदा विभागाने या विषयावर चर्चा करून तोडगा काढावा व दोन्ही कालव्यांची कामे चाऱ्यांसहित येत्या दोन ते तीन वर्षांत पूर्ण करून शेतकरी राजाचा कायमचा दुवा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र भूजल विकास व व्यवस्थापन कायद्याविषयी सविस्तर माहिती देताना या कायद्याच्या कचाट्यात शेतकरी व शेती व्यवसाय अडचणीत येऊ नये, यासाठी शेती व पाणी क्षेत्रातील अग्रगण्य मान्यवर व लोकप्रतिनिधींनी दक्ष राहणे आवश्‍यक असल्याचे मत चकोर यांनी व्यक्त केले. अकोले संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरीसह सिन्नर तालुक्‍यातील गावांमधील पिकांची वस्तुनिष्ठ आणेवारी तपासावी व त्याचप्रमाणे यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने जनता व पशुधनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
भोजापूर धरणाचे हक्काच्या पाण्यासाठी दुष्काळी भागातील तरुण पिढीसह सर्वांना एकत्र करून संघटितपणे मोठा लढा उभारावा लागणार असल्याचे ऍड. संग्राम जोंधळे यांनी सांगितले.
या प्रसंगी राजू सोनवणे, जिजाबापू आहेर, विनायक गुंजाळ, रघुनाध मोकळ, अण्णासाहेब चकोर, किसन चत्तर, उत्तम जोंधळे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भोजापूर धरणाची उंची वाढवा

भोजापूर धरणाची किंवा सांडव्याची उंची किमान एक मीटर वाढवून निमोण-तळेगाव परिसरातील व सिन्नर तालुक्‍यातील दुष्काळी गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस कृती करावी. यासाठी केंद्रीय जलसंसाधनमंत्री व राज्य जलसंपदामंत्र्यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आदेश देऊनसुद्धा सकारात्मक कार्यवाही होत नसल्याचे मंत्री व विरोधी पक्षनेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)