निळवंडे धरण अकोले तालुक्‍यास ठरणार शाप

प्रा. डी. के. वैद्य
अकोले: अकोले तालुक्‍यात निळवंडे प्रकल्प बांधून तयार झाला खरा. तथापि बारमाही भंडारदरा धरणाचे पाणी निळवंडे प्रकल्पाच्याकडे हस्तांतरित करण्याचा डाव जलसंपदा विभागाने खेळला गेल्याने अकोले तालुक्‍याला हे धरण वरदान ठरणार नसून, शापच ठरण्याची सार्थ भीती व्यक्त केली जात आहे.

या प्राप्त परिस्थितीमुळे शाहीर अमर शेख यांच्या कलापथकात ‘टाटा बाटा सांगा आम्हाला ! आमचा वाटा कुठे आहे हो ?’ ही कष्टकऱ्यांची ललकारी जशी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकांच्या मनाचा ठाव घेत होती, तशीच ही वेळ अकोले तालुक्‍यातील आदिवासी, कष्टकरी, शेतकरी व पाण्यापासून वंचित असणाऱ्या घटकाला देणाऱ्या अकोले तालुक्‍यातील जनतेची झाली आहे. त्यामुळे आता सध्या आमचा निळवंडेचाही वाटा अथवा हिस्सा सांगा? आमचा कालव्याचा आणि उच्चस्तरीय कालव्ययाचा हिशोब द्या ? मग कालवे बनवण्याच्या कामाला लागा. त्यामुळेच आंदोलनाचा पवित्रा पाटग्रस्त शेतकऱ्यांनी घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अकोले तालुक्‍याला ऐंशीच्या दशकात लाभार्थी नेते, कारखानदार ‘पाणी चोर’ म्हणून हिणवत होते. त्यातून खऱ्या अर्थाने ‘पाणी हक्क लढाईचा नारा बुलंद’ झाला. त्यासाठी ‘भंडारदरा चाक बंद आंदोलन’ किंवा अन्य आंदोलनांनी यासाठी जीवाची बाजी लावली. जिथे पाणी पिकते तिथे मात्र ते पाणी मिळत नव्हते. त्या तालुक्‍याला धरणाच्या पाण्याचा 11.70 टक्के इतका हिस्सा मिळवून देणारे ऐतिहासिक काम तत्कालीन लोकप्रतिनिधी मधुकरराव पिचड यांच्या मुळे प्राप्त झाले. मात्र यासाठी संघर्ष करावा लागला. जनतेची भावना ओळखून ज्येष्ठ नेते व तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अकोलेकरांच्या मागणीला झुकते माप टाकले. आणि अकोले, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी या तालुक्‍यांच्या वाट्याला पाणी आले. त्यातून वंचित अकोले तालुक्‍याला संघर्ष करून मिळालेला पाण्याचा लढाही मामलेदार जाळण्याच्या घटनेच्या समांतर असा हा प्रवास ठरला, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

अकोले तालुक्‍यातील निळवंडे धरणापासून ते कळस गावापर्यंत म्हणजे अकोले तालुक्‍याच्या सरहद्दीपर्यंत भंडारदरा धरणाचे बारमाही पाणी मिळू लागले. स्वकष्टाने कष्टाळू शेतकऱ्यांनी पाइपलाइनच्या माध्यमातून आपली शेती फुलवली आणि त्याद्वारे ऐश्‍वर्याची जनतेची आणि कष्टाच्या फळाची प्राप्ती करून देण्याची वाट त्यांनी खऱ्या अर्थाने बनवली. निळवंडे धरण ते कळस यादरम्यान उपसा सिंचन योजनेद्वारे 2889 हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले. त्यामुळे या धरणाचे 462 दशलक्ष घनफूट पाणी अकोले तालुक्‍याच्या पूर्व भागाला मिळू लागले. हे पाणी जलसंपदा विभागाने निळवंडे प्रकल्पाकडे वर्ग केले. त्यामुळे हे वाढीव क्षेत्र निळवंडेत आल्याने अकोले तालुक्‍यातील बारमाही पाणी उचलणारे शेतकरी आता निळवंडे कालव्याच्या पाण्याचे लाभार्थी ठरणार आहेत. अशा प्रकारची जलसंपदा विभागाने चाल केली असल्याने अकोले तालुक्‍याची जनता त्यांच्यावर नाराज असून, या धोरणामुळे अकोले तालुक्‍याचा या पाण्यावर हक्क संपून निळवंडे धरणाच्या पाण्यावर हक्क शाबीत होणार आहे.

धरणे अकोले तालुक्‍यात, प्रकल्पग्रस्त अकोले तालुक्‍यात, त्यांचे पुनर्वसन अकोले तालुक्‍यात आणि एवढे सर्व घडूनही भंडारदरा धरणाप्रमाणेच निळवंडेचे पाणीही अकोले तालुक्‍याला मिळणार नसेल, तर अकोले तालुक्‍यातील डाव्या कालव्याचे शून्य ते 28 किलोमीटर उजव्या कालव्याचे काम का होऊ द्यायचे ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अकोले तालुका तर पाण्याला जरूर वंचित आहे. पण पाण्यासाठी दुष्काळी तळेगाव दिघे, कोपरगाव, श्रीरामपूर, राहता, राहुरी या तालुक्‍यांना हे निळवंडेचे पाणी मिळालेच पाहिजे. त्यांना या पाण्याची आस आहे, नव्हे त्यांची संसार उमलण्याची स्वप्ने या पाण्यावर निश्‍चित अवलंबून आहेत. परंतु अकोले तालुक्‍याचे शेतकरी वंचित ठेवून त्यांना त्यांचा प्रपंच बनवायचा असेल तर त्यांनी अकोले तालुक्‍यातील लाभार्थी जनतेचे म्हणणे समजावून घेऊन त्यांच्या भूमिकेला न्याय मिळेल, अशी पावले उचलली पाहिजेत.

निळवंडे धरणाचे अकोले तालुक्‍यात कालवे झाल्यावर अकोले तालुक्‍याला आपला हक्क लागणार आहे आणि पाणी चोर ठरवणार त्यांच्याकडून संघर्ष करून मिळवलेले 11.70 टक्के भंडारदराचे पाणी खरेतर बारमाही पाणी व हक्काचे पाणी हे आठ माहीत रूपांतरित होणार आहेत. निळवंडे धरणाचा मिळणाऱ्या अकोले तालुक्‍यातील प्रवरा खोऱ्यातील शेतीसाठी निळवंडे धरणाचे पाणी बारमाही पाणी कमी करून निळवंडेचे वाढीव क्षेत्र निर्माण करणे जलसंपदा विभाग अकोले तालुक्‍याची शेती, शेतकरी उद्‌ध्वस्त करण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यामुळे निळवंडे धरण शाप ठरणार आहे अशी मानसिकता तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आहे.यासाठी बारमाही धरणाचा लाभ किंवा हक्क कायम ठेवून वंचित शेतीला अकोले तालुक्‍याच्या शेतकऱ्यांना निळवंडे धरणाचे पाणी मिळण्यासाठी धरणाच्या पाण्याच्या फिर वाटपाची वाटप करण्याची गरज आहे.भंडारदरा या धरणाचे पाणी निळवंडेला सोडून ते उच्चस्तरीय कालव्यावरून द्वारे अकोले तालुक्‍यातील शेतीला किमान फेब्रुवारी महिन्यात जर मिळाले तर या तालुक्‍यातील वंचित भागाला न्याय मिळवून दिला जाईल.
(क्रमशः)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)