निळवंडेला केंद्रीय गुंतवणूक समितीची मान्यता

ना. विखे, खा. लोखंडे यांच्याकडून श्रेयासाठी पत्रकबाजी

शिर्डी – उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे प्रकल्पाला केंद्रीय गुंतवणूक मंजुरी समितीची नुकतीच मान्यता मिळाली आहे. मात्र याबाबत खासदार सदाशिव लोखंडे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पत्रकाद्वारे यासाठी आपण पाठपुरावा केल्याचे सांगत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गुरुवारी नवी दिल्ली येथील केंद्रीय जलसंपदाच्या श्रमिक भवनात ही बैठक झाली. यावेळी ऊर्ध्व प्रवरा दोनबाबत (निळवंडे) चर्चा होऊन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. यावेळी नाशिक उ. म. प्र.चे कार्यकारी अभियंता के. बी. कुलकर्णी, कार्यकारी अभियंता रविंद बागूल व उपकार्यकरी अभियंता विवेक लव्हाट उपस्थित होते. या मान्यतेमुळे निळवंडे कालव्यांसाठी केंद्राकडून मिळणाऱ्या 25 टक्के निधीचा मार्ग मोकळा झाला आहे.

निळवंडे प्रकल्पाला गेल्या वर्षीच तांत्रिक समितीची मान्यता मिळाली. परंतु केंद्राच्या योजनेतून निळवंडे प्रकल्पाला केंद्रीय गुंतवणूक मंजुरी समितीची मान्यता मिळणे बाकी होते. त्यामुळे राज्य सरकारने निळवंडे कालव्यांवर निधी खर्च केल्यानंतर 25 टक्के निधी केंद्र सरकार विना शर्त देणार आहेत. या समितीची मान्यता मिळाल्यामुळे केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेत निळवंडे प्रकल्पाचा समावेश होऊ शकतो, असेही खासदार लोखंडे यांनी सांगितले. तसेच याप्रश्‍नी आपण केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकर यांच्याकडे पत्राद्वारे आग्रही मागणी केल्याचे ना. विखे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे येथेही श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत मात्र समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

या मान्यतेमुळे प्रकल्पावर कोणतीही वित्तीय संस्था गुंतवणूक करू शकते. केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेत प्रकल्प बसण्यास पात्र झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या दृष्टीने अतिशय मोठे काम झाले आहे.
– रवींद्र बागूल, कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व प्रवरा 2

निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी केंद्र सरकारने निधीची उपलब्धता करून द्यावी, यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या निधी करिता आवश्‍यक असलेल्या सर्व विभागांचे नाहरकत दाखले तसेच राज्य वित्त समितीची आवश्‍यक असलेली शिफारस केंद्र सरकारकडे गेल्याने या प्रकल्पाला आवश्‍यक असलेला निधी तातडीने मंजूर करावा, आशी मागणी आपण केली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते

निळवंडे प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या मान्यतेनंतर या मंजुरीची प्रतीक्षा होती. आता प्रकल्प केंद्राच्या सर्वच कसोट्यांवर उतरला आहे. केंद्रातून विविध मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न केले. केंद्रीय गुंतवणूक मंजुरी समितीच्या मान्यतेमुळे निळवंड प्रकल्पाला निधी मिळण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत.
– खा. सदाशिव लोखंडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)