निर्लेखन शाळा पाडण्याचे आदेश

स्लग- जिल्ह्यातील सर्व शाळांचा तपासणी सुरू

नगर – नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचा स्लॅब पडून झालेल्या दुर्घटनेमुळे जाग असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या शाळांची तपासणी करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यासह गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबरोबर निर्लेखन करण्यात आलेल्या सर्वच 203 शाळा तातडीने पाडण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने यांनी आज दिले.

निंबोडी येथील घटना ताजी असतांना मंगळवारी रात्री श्रीगोंदा तालुक्‍यातील घारगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा जमिनदोस्त झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारतीचा विषय ऐरणीवर आला आहे. अर्थात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निंबोडीच्या घटनेनंतर लगेच मोडकळीस आलेल्या खोल्यांमध्ये शाळा न भरविण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात आजही 214 शाळांचे निर्लेखन करण्यात आले असतांनाही त्या पाडण्यात न आल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे चांगलेच वाभाडे निघाले आहेत. त्यामुळे प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या मोडकळीस शाळांसह भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना होवून नये म्हणून आतापासून उपाययोजना सुरू केली आहे.

माने यांनी आज दुपारी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाची बैठक घेवून जिल्हा परिषद मालकीच्या इमारतीबाबत ऑडीट करण्याचे आदेश दिले आहे. सर्वप्रथम प्राथमिक शाळांची माहिती घेवून तपासणी करण्याचे आदेश दक्षिण व उत्तर कार्यकारी अभियंत्यासह गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबरोबर निर्लेखन करण्यात आलेल्या 203 शाळा तातडीने पाडून त्याचा अहवाल देण्याचे आदेश माने यांनी या बैठकीत दिले. या निर्लेखन करण्यात आलेल्या शाळांच्या खोल्यांमध्ये शाळा भरू नये, शाळा भरण्याचा प्रयत्न कोणी करणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश माने यांनी दिले. यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः जावून पाहणी करावी. या खोल्यांना विद्यार्थी बसणार नाही याची दक्षता घेवून त्यांची अन्यत्र व्यवस्था करण्याचे काम देखील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करावे असे आदेश त्यांनी दिले आहे. प्राथमिक शाळांची तपासणी झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र, अंगणवाड्यासंह अन्य इमारतीची तपासणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)