निर्मला सीतारामन यांचा एचएलबाबत छाती ठोक दावा !

एचएएल कंपनीच्या कंत्राटांचे प्रकरण

नवी दिल्ली: एचएएल कंपनीच्या आर्थिक स्थितीवरून संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि राहुल गांधी यांच्यातील तुतु-मैमै आजही सुरूच राहिली. आर्थिक अडचणीत आलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कंपनीला एक लाख कोटी रूपयांची कंत्राटे दिल्याचा दावा निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत सिद्ध करावा नाही तर त्यांनी संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असे थेट आव्हान राहुल गांधी यांनी निर्मला यांना दिले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले की आम्ही गेल्या चार वर्षात 26 हजार 570 कोटी रूपयांची कामे या कंपनीला दिली असून अजून 73 हजार कोटी रूपयांची कामे त्यांना दिली जात आहेत. तथापि राहुल गांधी यांनी त्यांचा हा दावा म्हणजे पुन्हा साफ खोटारडेपणा असल्याचे म्हटले आहे. त्यांना 73 हजार कोटी रूपयांची कामे देण्यात येतील हे म्हणणे म्हणजे साफ बकवास आहे असे ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी आज कागदपत्री नोंदींसह निर्मला सीतारामन यांचे म्हणणे खोडून काढले. एचएएल कंपनीला 73 हजार कोटी रूपयांची कामे दिली जात आहेत आणि त्या प्रस्तावांचे टेक्‍निकल ईव्हॅल्युशन सुरू आहे असे निर्मला सीतारामन यांचे म्हणणे म्हणजे स्वत:चेच म्हणणे खोटे आहे असे सिद्ध करणारे आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. अजून त्या कंपनीला प्रत्यक्षात कसल्याच कामाची ऑर्डर मिळालेली नाही तर त्या आम्ही त्यांना एक लाख कोटी रूपयांच्या ऑर्डर दिल्याचा दावा कशाच्या आधारे करतात असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

तत्पुर्वी संसदेत बोलताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारान यांनी सांगितले की आमच्या सरकारने सन 2014 ते 2018 या काळात सरकारने कंपनीला 26 हजार 570 कोटी रूपयांची कामे दिली आहेत. आणि त्याचे कन्फर्मेशन मला त्या कंपनीकडूनही मिळाले आहे. त्या खेरीज अन्य 73 हजार रूपयांची कामे अजून प्रस्तावित आहेत. त्यामुळे मी या आधी संसदेत केलेले निवेदन खरे आहे हेच सिद्ध होत असून माझ्यावर खोटे आरोप करून दिशाभुल केली जात आहे असे त्या म्हणाल्या.

73 हजार कोटींचे प्रकल्प पाईपलाईन मध्ये आहेत म्हणजे त्या ऑर्डर अजून त्यांना प्रत्यक्ष मिळालेल्या नाहीत याचीच कबुली आहे असा पलटवार राहुल गांधी यांनी केला. याचाच अर्थ एचएएल कंपनीला एक लाख कोटी रूपयांची ऑर्डर दिली आहे हा निर्मला सीतारामन यांचा दावा खोटा ठरता असे ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की एचएएल कंपनी सध्या आर्थिक डबघाईला आली असून या कंपनीला मार्केट मधून पैसे उसने घेण्याची वेळ सरकारने आणली आहे. या मागे त्यांचा डाव आहे. या कंपनीतील कर्मचाऱ्यांचे पगार थकवायचे आणि त्यांना कंपनी सोडायला भाग पाडून त्यांना अनिल अंबानी यांच्या कंपनीकडे जाणे भाग पाडायचे असा हा डाव आहे. एचएएल कंपनीकडे विमान क्षेत्रातील अनुभवी व टॅलेंटेड कर्मचारी आहेत ते अनिल अंबानी यांच्या कंपनीला मिळवून देण्याचा हा कट आहे असा आरोपही त्यांनी केला.

विमान न येताच दसॉल्ट कंपनीला पेमेंट
फ्रांसच्या दसॉल्ट कंपनीकडून भारताला अजून एकही राफेल विमान मिळालेले नसताना मोदी सरकारने त्या कंपनीला 20 हजार कोटी रूपयांचे पेमेंट कसे केले असा सवाल राहुल गांधी यांनी आज केला. ते म्हणाले की हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स कंपनीचे लष्कराकडे 15 हजार 700 कोटी रूपयांचे येणे थकले आहे. ते थकित पेमेंट एचएएल कंपनीला देण्यासाठी मोदी सरकारकडे पैसे नाहीत आणि दसॉल्ट कंपनीला प्रत्यक्ष विमान न मिळताच 20 हजार रूपयांचे पेमेंट करण्यासाठी कसे पैसे आले असा सवालही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)