निर्भय आणि निःस्पृह संन्यासी

  कथाबोध

डॉ. न. म. जोशी

विशालनगरीचा राजा न्यायी आणि परोपकारी होता. तो सद्‌गुणांचा चाहता होता पण दुष्कृत्याला त्याच्या दरबारी कठोर शासन होत असे. एकदा असं झालं राणीचा रत्नहार महालातून गायब झाला. चोरानं चोरून नेला. राणीला तो रत्नहार अत्यंत प्रिय होता. राणी दुःखी झाली. आवडता रत्नहार गेला म्हणून ती उदास दिसू लागली. राजानं ठरवलं, चोरालाही संधी द्यावी. पश्‍चातापाला वाव द्यावा. म्हणून त्यानं घोषणा केली… “”ज्या कुणी हा रत्नहार चोरून नेला असेल त्यानं तो तीन दिवसांच्या आत आपणहून परत करावा. त्याला मृत्युदंड माफ केला जाईल. पण तीन दिवसांनंतर राज्याचे शिपाई हार शोधतील. ज्याच्याकडं हार मिळेल त्याला फाशी होईल.”

राज्यभर दवंडी पिटली. ज्या चोरानं हार चोरला होता त्यानं ही दवंडी ऐकताच तो घाबरला न जाणो तीन दिवसाच्या आत हार परत करूनही राजानं आपल्याला शिक्षा केली तर..असा विचार करून आपल्यावर आळ येऊ नये म्हणून त्यानं तो रत्नहार एका संन्याशाच्या मठीत खिडकीतून खाली फेकून दिला. संन्यासी नदीवर स्नानासाठी गेले होते. परत येताना तर त्याला मठीत हा रत्नहार दिसला. त्या संन्याशानंही राजाची घोषणा ऐकली होती. खरं तर त्याला तो हार लगेच परत करणं आवश्‍यक वाटत होतं. पण नाही. संन्यासी तीन दिवस पूर्ण होईपर्यंत थांबला. चौथ्या दिवशी तो राजमहालात गेला आणि त्यानं रत्नहार परत केला. तो रत्नहार परत करताना संन्याशानं हेही सांगितलं की हा रत्नहार कुणीतरी आपल्या मठीत टाकला होता.

राज्याला आश्‍चर्य वाटलं आणि राजा विचारातही पडला. राजानं संन्याशाला विचारलं, “”संन्यासीमहाराज, तुम्ही हार तुमच्याजवळ तीन दिवस का ठेवून घेतलात? आणि नंतर मला तो परत का केलात?” संन्यासी हसले आणि म्हणाले, “”राजन मी हार परत केला कारण संन्याशाला याची गरज नसतेच. संन्यासी निःस्पृह असतो. पण हा हार मी तीन दिवसांपूर्वीच परत केला असता तर मी मृत्यूला घाबरलो असं लोकांना वाटलं असतं. मला मृत्युदंडाचं मुळीच भय नाही.मी निर्भय आहे. खुशाल मला मृत्युदंड कर.”

संन्याशाचं हे उत्तर ऐकून राजा चमकला. आदरानं तो वाकला आणि म्हणाला, “”योगीराज, आपल्यासारख्या निःस्पृह आणि निर्भय संन्याशाला आम्ही कोण मृत्युदंड देणार… आपण सुखानं आपल्या मठीत जावं आम्ही आपला आदरच करतो. धनकांचनाची  ज्याला अभिलाषा असते तो निर्भय असू शकत नाही. निःस्पृहपणा आणि निर्भयपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कारण विकार आहे तिथं भय आहे. भय आहे तिथं पाप आहे. सत्याच्या प्रकाशात निर्भय माणूस निःशंकपणे वाटचाल करू शकतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू आहेत. ते माणसाला लज्जीत तर करतातच पण विनाशाकडेही नेतात. म्हणून माणूस निर्भय होऊ शकत नाही. निर्लोभ म्हणजेच निर्भयता!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)