निर्भयामुळे तक्रारींचा रेषो खाली

 

संजोक काळदंते

शिवनेरी- पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यात निर्भया पथक नेमण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विद्यार्थीनी सुरक्षा समिती, महिला सुरक्षा समिती नेमणे आणि महिला दक्षता समिती पुनर्गठीत करण्याचे फर्मान काढले आहे. यानुसार महिला दक्षता समिती पुनर्गठीत करुन 100 सदस्यीय समिती गावांमध्ये तयार होतेय तर निर्भया पथक नेमुन महिला व विद्यार्थीनीच्या सुरक्षेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासंदर्भात पाटील यांनी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे. यामुळे महिलांवरील अन्याय अत्याचाराला आळा बसणार आहे.
जुन्नर तालुक्‍यात ओतुर, नारायणगाव, आळेफाटा, बेल्हे, जुन्नर या पोलीस ठाण्या अंतर्गत निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली आहे तर काही ठिकाणी महाविद्यालय आणि शाळांमध्ये देखील जाऊन तेथील विद्यार्थीना याविषयी माहिती देण्यात आली. त्यांच्या समस्या समजुन घेऊन त्याचे निराकरण करण्यात आले. एस. टी. स्टॅंड, शाळा मार्ग, कॉलेज मार्गावर फिरणाऱ्या टवाळखोर रोडरोमीओंमुळे मुलींना सुरक्षित वाटत नव्हते. मात्र, सर्व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षका यांची सुरक्षे संदर्भात मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये शालेय विद्यार्थी यांची सुरक्षा, कॅम्पसमध्ये छेडछाड, रॅगिंग टाळण्याकरीता निर्भया तक्रार पेटी ठेवण्यात आली. मुलींच्या तक्रारी आल्यावर लगेच त्यांचे निवारण केले जात असल्याने हळुहळु येणाऱ्या तक्रारींचा रेषो देखील खाली येत चालला असल्याचे चित्र जुन्नर तालुक्‍यात बघायला मिळतेय.
शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात व शालेय विद्यार्थी ने-आण करणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत वाढ झाली आहे. तसेच परिसरामध्ये आगीची किंवा नैसर्गिक आपत्तीच्या घटनेला सामोरे कसे जावे याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे आदी महत्वाच्या मुद्दयाबाबत सूचना, पोलीस ठाण्याचा नंबर व निर्भया पथकांचा नंबर देऊन थेट संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्योती डमाले या तालुक्‍यातील महिला अधिकारी निर्भया पथकाच्या प्रमुख असून दोन पोलीस कर्मचारी तीन महिला पोलिस कर्मचारी या पथकामध्ये काम करतात. पोलीस व्हॅनसह हे फिरते पथक असल्याने तालुक्‍यात महिलांबाबत पोलीस ठाण्यांमधे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण घटले आहे. तसेच यापूर्वी मुली तक्रार करायला पुढे येत नसत. मात्र, आता कुठे काही गैरप्रकार झाल्यावर मुली स्वतःहुन समोर येतात व तक्रार करतात याचा अर्थ निर्भया पथक स्थापन करण्याचा मूळ हेतु साध्य होतोय असे दिसून येत आहे.
बॉक्‍स

  • रोडरोमीओंना बसला चाप
    निर्भया पथकात महिला पोलिस अधिकारी आवश्‍यक आहेत. मात्र, तालुक्‍यातील नारायणगाव व ओतुर पोलीस ठाण्या अंतर्गत महिला पोलीस अधिकारी नव्हेत. त्यामुळे नारायणगावचे सहाय्यक पोलीसनिरिक्षक अजय गोरड यांनी देखील निर्भया पथक कार्यान्वित ठेऊन विद्यार्थीनी व महिला सुरक्षितताबाबत योग्य पाऊल उचलेले आहे. तसेच ओतुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुरज बनसोडे यांनी निर्भया पथकात एक महिला पोलीस कर्मचारी नेमुन येथेही तक्रारींचे निवारण केलेले आहे. यामुळे रोडरोमीओंना चांगलाच चाप बसलाय. विद्यार्थीनी व महिलांच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. एकुणच जुन्नर तालुक्‍यात निर्भया पथकाच्या फिरते स्कॉड, कारवाया आणि समुपदेशन यामुळे पोलीस ठाण्यांमधील महिला व विद्यार्थीनींच्या तक्रारींचा रेषोखाली आलाय ही उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल.
  • जुन्नर तालुक्‍यात शाळा-महाविद्यालयात 41 ठिकाणी भेटी दिल्या असून 26 शाळांमध्ये व 8 महाविद्यालयांत विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. 18 ठिकाणी पोलीस निर्भया पथकाने समुपदेशन केलेले आहे तर तालुक्‍यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 110/112 अन्वये कारवाया देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील पोलीस ठाण्यात विद्यार्थीनींचे तक्रार करण्यासाठी फोन कमी येत आहेत.
    ज्योती डमाले, निर्भया पथकाच्या प्रमुख
  • तालुक्‍यात फिरते पथक कार्यरत असल्याने विद्यार्थीनींना शाळा, महाविद्यालय, बसस्थानक या ठिकाणी रोडरोमीओंचा त्रास कमी झालेला आहे. महिलांच्या तक्रारीचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
    दिपाली खन्ना, उपविभागीय पोलिस अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)