निर्भयाने संधी साधली , ट्रॅफिक शाखेने गमावली

कराड – येथे झालेल्या स्व. यशवंतराव कृषी-औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनात शासकीय खात्यांसाठी मोफत स्टॉल्स देण्यात आले होते. ही संधी साधून निर्भया पथकाने महिला, युवतींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. निर्भयासह वन खाते, तहसील कार्यालयानेही आपल्या खात्याच्या योजनांची माहिती पत्रके लोकांना वाटली. वाहतूक शाखेला प्रदर्शनाच्या माध्यमातून लोक जागृतीचे चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले होते. मात्र, ही संधी ट्रॅफिक शाखेला साधता आली नाही.
शहर लहान असो वा मोठे, तेथील वाहतुकीचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो.

वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीवरील ताण वाढला आहे. अशावेळी वाहतूक नियंत्रण शाखेची जबाबदारीही वाढली आहे. विना हेल्मेट, विना परवाना वाहन चालविणे, सिटबेल्ट न लावता गाडी चालविणार्यांवर ट्राफीक शाखा कारवाईचा बडगा उगारते. कितीही वेळा कारवाई झाली तरी वाहनधारकांमध्ये सुधारणा होत नाही. त्यामुळे केवळ कारवाई करून हे प्रश्न सुटत नाहीत आणि सुटणारही नाहीत. त्यासाठी प्रबोधनाचा कार्यक्रमही राबविला गेला पाहिजे. अल्पवयीन मुले, मुली विनापरवाना गाडी चालविताना सातत्याने ट्राफीक पोलिसांच्या तावडीत सापडतात. त्यांच्याकडून अपघात होतात. त्याचे होणारे परिणाम पालकांच्या लक्षात आणून देण्यावर वाहतूक शाखेने भर द्यायला हवा. यासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरले असते. मात्र, वाहतूक शाखा कृषी प्रदर्शनात वाहतुकीचे नियंत्रण करत बसली आणि एक चांगली संधी गमावली.

प्रदर्शनातील स्टॉलवर वाहतूक शाखेने अपघातांचे नियम, दंडात्मक तरतुदी, अपघाताची कारणे आणि त्यासाठीच्या शिक्षेची तरतूद, याबद्दलची माहिती नागरीकांना दिली असती, तर निश्‍चितच ती सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहचली असती. केवळ पावत्या करून आणि दंड वसूल करणे, एवढेच आपले काम आणि जबाबदारी, असा वाहतूक शाखेचा समज झाला आहे. मात्र, तेवढ्याने वाहतूक शाखेची जबाबदारी संपणार नाही. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना ज्यावेळी स्वत:च्या होणाऱ्या नुकसानीची कल्पना येईल, त्यावेळी त्यांच्यात निश्‍चित फरक पडेल. त्यासाठी एकदा प्रबोधनाचाही मार्ग वाहतूक शाखेने अवलंबलायला हवा. तशी संधी कृषी प्रदर्शनाने दिली होती. मात्र, वाहतूक शाखेने ती गमावली. पुढील वर्षी तरी वाहतूक शाखेने प्रबोधनाचा प्रयोग करायची संधी दवडू नये, इतकेच.

कौतुक आणि तक्रारी…

बसस्थानकासमोरील नव्या जागेत स्थलांतर झाल्यानंतर वाहतूक शाखेने चार-पाच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून बसस्थानक परिसरातील घडामोडींवर नजर ठेवली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारून परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यात सर्वाधिक केसेस आणि दंड वसूल केला. याबद्दल खुद्द आयजींनी कौतुक केले. एकीकडे कामाचे कौतुक होत असताना दुसरीकडे तक्रारींचा सूर देखील जोरात आहे. वाहतूक शाखेतील एका महिला पोलिसाच्या अरेरावीमुळे लोक वैतागले आहेत. संबंधित महिला कर्मचाऱ्याच्या बदलीचीही मागणी होत आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने तर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात थेट मुख्यमंत्र्यांनाच निवेदन दिले आहे. तरीही वरिष्ठांनी आपल्या डोळ्यावर कातडी ओढली आहे. आता वरिष्ठांचे डोळे कधी उघडतात, ते बघूया!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)