निर्बंधांसमोर राजकीय पक्षांना झुकावे लागणार!

उमेदवाराच्या शक्तीप्रदर्शनाला लगाम : अधिकारी कक्षात मोबाईलला देखील मज्जाव

नगर – महापालिका निवडणुकीत आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाच्या निर्बंधांसमोर राजकीय पक्षांना झुकावेच लागणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना अधिकाऱ्याच्या दालनात चौघांनाच प्रवेश, मोबाईलला निर्बंध, शक्तिप्रदर्शन केल्यास थेट आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. दरम्यान, प्रशासनाने निवडणुकीच्या कामासाठी सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

जिल्हाधिकारी, प्रभारी आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांना बरोबर घेऊन प्रशासकीय पातळीवर निवडणुकीचे नियोजन केले आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या सूचना देताना कोठेही अधिकाऱ्यांनी कमी पडता कामा नये, असे द्विवेदी यांनी सांगितले आहे. आचारसंहितेच्या भंगाची कारवाईची सुरूवात अर्ज भरण्यापासून देखील करता येऊ शकते. उमेदवाराला अर्ज भरायला येताना त्याच्यासह चौघांनाच अधिकाऱ्याच्या दालनापर्यंत येता येणार आहे. चारपैक्षा जास्त व्यक्ती उमेदवाराबरोबर आल्यास, त्याविरोधात थेट आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. द्विवेदी यांनी पुढे जाऊन या कक्षात उमेदवारासह त्याच्याबरोबर असणाऱ्या तिघांना मोबाईल आणण्यास देखील निर्बंध घातले आहेत.

प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे उमेदवारांच्या उत्साहाला काहीसा लगाम बसणार आहे. निवडणूक प्रशासकीय पातळीवर भयमुक्त वातावरणात झाली पाहिजे, याची पूर्णतः खबरदारी घेण्याच्या सूचना राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहे.

आचारसंहितेच्या चारही पथकांना कारवाईच्या सूचना देत, कठोर व्हा, शहरात कायदा व शांतात ठेवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे पालन करताना अधिकाऱ्यांनी कोणताही गैरप्रकार करू नये. तसे आढळल्यास आणि तक्रार मिळाल्यास ती खपवून घेतली जाणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी यांचा हुकूम का “इक्का’!
महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी त्यांच्याच पातळीवर केली होती. मतदार याद्यांपासून ते मतमोजणीपर्यंत सर्वच पातळीवर हे काम करण्याचे नियोजन आहे. महापालिका प्रशासन मात्र निवडणुकीच्या मतदार याद्यातच फसले. प्रभाग रचनेत अनेक मतदार इकडेतिकडे झाले. त्यावरून चांगलीच ओरड झाली. मतदारांसह राजकीय पक्षाने यावर तक्रारी केल्या. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेचा प्रभारी आयुक्त पदाचा पदभार आहे. असे असताना हा प्रकार झाल्याने त्यावर राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. राहुल द्विवेदी यांना शेवटी जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांना बोलावून घेत हा मतदार याद्यांचा घोळ निस्तरला. राहुल द्विवेदी यांनी दाखविलेला विश्‍वास अरुण आनंदकर यांनी हा याद्यांचा घोळ निस्तारून खरा ठरविला. राहुल द्विवेदी यांनी हाच हुकमी “इक्का’ नियोजनासाठी आता पुढे केला आहे. अरुण आनंदकर यांनी निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था असल्याची जाणीव निवडणुकीचे काम पाहणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बैठकीत करून दिली. निवडणुकीचे नियोजन करताना प्रशासकीय पातळीवर आचारसंहितेची अंमलबजावणी किती बारीक-सारीक गोष्टींतून सोप्यापद्धतीने करता येते, हे आनंदकर यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीची आचारसंहितेची अंमलबजावणी आता द्विवेदी आणि आनंदकर यांच्या नजरेतून होत आहे. राजकीय पक्ष, अपक्ष उमेदवारांना ही आचारसंहिता पाळताना जडच जाणार असे चित्र आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही त्यासाठी काटेकोरपणे उभे रहावे लागणार आहे.

तडीपारीचे आज 127 प्रस्ताव प्रशासनाकडे वर्ग
कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी आणि भिंगार कॅम्प पोलिसांनी तडीपारीच्या प्रस्ताव पाठविण्यास सुरूवात केली आहे. कोतवाली पोलिसांकडून 225 जणांवर तडीपारीची कारवाई होणार आहे. त्यातील आज 28 जणांचे प्रस्ताव प्रशासनाकडे वर्ग केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी दिली. तोफखाना पोलिसांकडून सुमारे 300 जणांवर तडीपारीच्या कारवाईचे नियोजन केले आहे. त्यातील आज 61 जणांचे प्रस्ताव दंडाधिकारी यांच्याकडे वर्ग केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी दिली. भिंगार कॅम्प पोलिसांनी 38 जणांचे तडीपारीचे प्रस्ताव आजच दुपारी प्रातंधिकारी कार्यालयाकडे वर्ग केल्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. एमआयडीसी पोलिसांकडून सुमारे सहा जणांवर तडीपारीची कारवाई होईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नगर शहरातून सुमारे 550 जणांवर तडीपारीची कारवाई होईल, असे शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)