निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मला आयुष्य दे! – छगन भुजबळ

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत बजाविला मतदानाचा हक्‍का

मुंबई – मनीलॉण्ड्रींग प्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी कॉग्रेंसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर भुजबळ यांनी देवाला भावनिक साकडे घातले. मी निर्दोष आहे. माझे निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध होईलच. पण माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मला चांगले आयुष्य दे, निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मला मरण येऊ देऊ नकोस, अशी प्रार्थना त्यांनी देवाकडे केली.

छगन भुजबळ हे मनी लॉण्ड्रींग प्रकरणात, तर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी रमेश कदम हे तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. भुजबळ हे आर्थर रोड, तर रमेश कदम हे भायखळा कारागृहात आहेत. हे दोघेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असून ते विधानसभेचे सदस्य आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत आपणाला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी या दोघांनीही न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना परवानगी दिल्यानंतर या दोघानांही पोलीस संरक्षणात विधानभवन येथे आणण्यात आले होते.

तासाभरासाठी विशेष सुट घेऊन बाहेर आलेल्या या दोघांनही मतदान केले. मतदानानंतर भुजबळ यांनी यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात जेवणही घेतले. कॅन्सर सोडल्यास मला अनेक आजारांनी ग्रासले असल्याचेही भुजबळांनी यावेळी सांगितले. मतदानानंतर छगन भुजबळ व रमेश कदम पुन्हा कारागृहाकडे रवाना झाले.

छगन भुजबळ हे दुपारी 12 च्या सुमारास विधानभवनात आले. त्यांना रूग्णवाहिकेतून आणण्यात आले होते. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, पंकज भुजबळ, शशिकांत शिंदे आदी आमदार त्यांना घ्यायला विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आले होते. भुजबळ येताच पक्षातील अनेक आमदारांनी भुजबळांच्या पाया पडून त्यांना अभिवादन केले.

संवाद साधताना भुजबळ भावूक…

यावेळी भुजबळ यांनी पक्षांच्या आमदारांशी संवाद साधाला. आमदारांशी बोलताना भुजबळ खूपच भावूक झाले होते. ते म्हणाले, मी निर्दोष आहे. माझ्यावर आरोप असलेल्या कंपन्यांमध्ये माझा शेअर अजिबात नाही. मी बाहेर आल्यावर थोडा वेळ मिळाला तर मी माझे निर्दोषत्व सिद्ध करेन. माझी देवाकडे एवढीच इच्छा आहे की, मला माझे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मला चांगले आयुष्य दे. खून करणारे देखील सुटतात. मग मीच असा काय गुन्हा केला की अजूनही मला कारागृहातच रहावे लागते, असा सवालही त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)