निरोगी आरोग्यासाठी व्यायाम आणि संतुलित आहार महत्त्वाचा

डॉ. मंगल सुपेकर: आरोग्य दिनानिमित्त ज्येष्ठ महिलांना निरोगी आरोग्याचा कानमंत्र
नम्रता दादी नानी ग्रुप

निरोगी आरोग्यासाठी उत्तम आहार व व्यायाम महत्त्वाचा आहे. अनेक आजार चुकीच्या आहारपध्दतीने उद्‌भवतात. योग्य आहाराकडे दुर्लक्ष केल्यास अनेक शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागते. आजार टाळण्यासाठी योग्य आहार व व्यायाम प्रतिबंधात्मक उपाय असल्याचे प्रतिपादन डॉ. मंगल सुपेकर यांनी केले.

जागतिक आरोग्य दिनानिमित्त नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने ज्येष्ठ महिलांसाठी आयोजित आहार व तणावमुक्‍त जीवन या विषयावर व्याख्यानात डॉ. सुपेकर बोलत होत्या. यावेळी शशिकला बोरा, ऍड. प्रज्ञा हेन्द्रे-जोशी, स्वाती गुंदेचा, ग्रुपच्या कार्यकारी अध्यक्षा अलकाताई मुंदडा, सचिव अनिता काळे, छाया रजपूत, उज्ज्वला बोगावत, सुनीता भागडे, अलका मेहेर, दीपा मालू आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे डॉ. सुपेकर म्हणाल्या, चिंताग्रस्त जीवन हे अनेक महिलांचा प्रश्‍न आहे. व्यायाम व छंद जोपासल्याने तणावमुक्‍त राहता येऊ शकते. तसेच घडलेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा, समोर येणाऱ्या परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीकोनाने सामना करण्याचे आवाहन केले. तसेच बदलत्या ऋतुनुसार आहारात कोणत्या पौष्टिक खाद्यांचा समावेश असावा?, वजन कमी करण्यासाठी घ्यावयाची काळजी, तसेच निरनिराळ्या व्याधीमध्ये आहार पध्दती संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली. महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन करताना ऍड. प्रज्ञा हेन्द्रे-जोशी म्हणाल्या की, कायदा व यंत्रणेबद्दल माहिती असल्यास महिलांना निर्भयपणे व आत्मविश्‍वासाने जगता येऊ शकते. हिंसा व भयमुक्‍त वातावरणात जगण्याचा महिलांना हक्‍क असून, यासाठी त्यांना कायद्याची व आपल्या हक्‍काची जाणीव असणे गरजेचे आहे. कौटुंबिक हिंसाचार व नोकरीच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. छाया रजपूत यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणबद्दल माहिती दिली. ज्येष्ठ महिलांसाठी विविध खेळ व बौध्दिक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्या महिलांना स्वाती गुंदेचा यांच्या वतीने हॅपी थॉटसचे विचार नियम पुस्तक बक्षीस स्वरुपात देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता काळे यांनी केले. उपस्थितांचे आभार दीपा मालू यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)