निराधार जयाला मिळाला आयुष्यभराचा जीवनसाथी

माहेर संस्थेत 108 वा विवाह सोहळा थाटात

शिक्रापूर- वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे अनाथ मुलांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्थेमध्ये पंधरा वर्षापूर्वी रेल्वे अपघातात आई वडिलांचे छत्र हरपल्याने माहेर संस्थेत दाखल झालेल्या जयाचे संगोपन माहेर संस्थेत झाले. आता माहेर संस्थेच्या मदतीने जया विवाह बंधनात अडकली असून तिला आयुष्यभराचा जोडीदार आणि आई वडील देखील मिळाले आहे. तिच्यामुळे माहेर संस्थेला 108 वा जावई मिळाला. या संस्थेत हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
पंधरा वर्षापूर्वी रेल्वे अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांना लहान मुलगी होती. त्या मुलीचे छत्र नियतीने हिरावून नेले. अपघातात आई- वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी तेथील रेल्वे पोलिसांच्या मदतीने या मुलीला मुळशी तालुक्‍यामध्ये अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या साधना व्हिलेज संस्थेत दाखल करण्यात आले. त्यांनतर काही काळाने या मुलीला त्या संस्थेच्या मदतीने वढू बुद्रुक येथील माहेर संस्थेत दाखल करण्यात आले. तेथे तिचा सांभाळ सुरु झाला. जयाचे शिक्षण देखील सुरू झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जया विवाहनुरूप झाली.
आंबेगाव तालुक्‍यातील लांडेवाडी येथील रामदास रेपाळे यांनी त्यांच्या मुलाचा विवाह अनाथालयातील अनाथ मुलीशी करून सून आणण्याचे ठरविले. माहेर संस्थेच्या माध्यमातून तिच्या विवाहाचा योग जुळून आला. राजेंद्र रेपाळे यांच्याशी जयाचा विवाह माहेर संस्थेमध्येच हिंदू विवाह पद्धतीनुसार पार पडला. यावेळी माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन, अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, साहेबराव भंडारे, संजय भंडारे, बाळासाहेब ढगे, शंकर आरगडे, एकनाथ चव्हाण यांसह आदी ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विजय आनंद यांनी जयाला संसारोपयोगी भेटवस्तू भेट देऊन तिच्या संसाराला शुभेच्छा दिल्या. माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन यांनी जयाला सासू सासरे, दीर, भावजय यांचा सांभाळ कर, गावाची, तालुक्‍याची व देशाची सेवा कर, अशा शुभेच्छा दिल्या. हा विवाह यशस्वी होण्यासाठी माहेर संस्थेतील वैभव पवार, आनंद सागर, हरिष अवचर, रमेश दुतोंडे, गौस सय्यद, प्रकाश कोठावळे, अनिता दुतोंडे, विक्रम भुजबळ, मीना भागवत, संदीप म्हेत्रे, मंगेश पोळ, रमेश चौधरी, वर्ष भुजबळ, राजू साकोरे यांच्यासह आदी परदेशी पाहुण्यांनी देखील विशेष परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)