अग्रलेख | निरर्थक अर्थमंत्री !

भारतापुढे आज ज्या साऱ्या समस्या आवासून उभ्या आहेत, त्या साऱ्यांचे मूळ अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. सारा देश आज विचीत्र अर्थिक परिस्थितीशी झुंजतो आहे. या स्थितीचा देशाच्या अर्थमंत्र्यांशी थेट संबंध जोडला जातो. पण आपले अर्थमंत्री अरूण जेटली यांना मात्र या स्थितीशी फारसे काही देणेघेणेच दिसत नाही. जेटली मध्यंतरी आजारी होते. त्यांच्यावर किडनी रोपणाची शस्त्रक्रीया झाली. त्यातून ते आता बरे होत असून त्यांना हालचाल करण्यास संधी मिळताच त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुकवरून पुन्हा विविध विषयांवर भूमिका मांडण्याचे काम सुरू केले आहे. सध्या ते अजून घरातूनच काम करीत आहेत. पण आजारपणातून आपण आता सक्रिय आहोत हे जगाला दाखवण्यासाठी ते सोशल मिडीयात प्रकट होऊ लागले आहेत. परवा त्यांनी फेसबुकवर न्यायव्यवस्थेतील नेमणुकांच्या विषयावर कॉंग्रेसने व्यक्त केलेल्या भूमिकेवर सडकून टीका केलेली वाचायला मिळाली. वास्तविक हा विषय आता मागे पडला आहे. त्याचा आज काही एक संदर्भ नसताना या संपलेल्या विषयात जेटलींनी विस्तृत भाष्य करून नेहमीप्रमाणे कॉंग्रेसवर त्यांच्या पुर्वीच्या राजवटीतील उदाहरणे देऊन टीकेची झोड उठवली आहे.

नोटबंदी आणि जीएसटीची इतकी गचाळ अंमलबजावणी केली गेली की या दोन्ही बाबतीत सरकारला दर दिवशी नवीन नियम आणि नवीन परिपत्रके काढून वेळोवेळी बदल करावा लागला आहे. लोकांची त्यातून पळापळ झाली, त्यांची दिशाभूल आणि फसवणूक झाली. आजही हे दोन्ही विषय तसे अर्धवट अवस्थेतच लटकून आहेत. हे जेटलींचेच अपयश आहे. विरोधक केवळ मोदींनाच टार्गेट करीत असल्याने जेटलींचे अपयश झाकले जात आहे.

वास्तविक या मागे पडलेल्या विषयावर जेटलींनी इतक्‍या उशिरा आणि इतक्‍या तावातावाने बोलण्याचे कारण काय? हा प्रश्‍न बहुतेकांना पडला. हा पुर्ण अनाठायी आणि गैरलागू विषय असल्याने त्यावर कॉंग्रेसनेही प्रतिक्रीया दिलेली नाही तरीपण जेटली यांनी अचानक या जुन्या विषयावर इतके भरभरून लिखाण करण्याची गरज काय हा प्रश्‍न लोकांच्या मनातून गेला नाही. बहुतेक दीर्घकाळच्या आजारपणाचा हा परिणाम असावा अशी समजूत करून लोकांनी त्यांची ती फेसबुकवरील लांबलचक पोस्ट फारशी मनावर घेतलेली नाही. हे जरी खरे असले तरी जेटलींनी हा जुना विषय केवळ गंमत म्हणून उकरून काढलेला नाही. तर लोकांचे लक्ष मुळ विषयांपासून भलतीकडेच वळवण्याचा त्यांचा हा पद्धतशीर डाव आहे हे सहज लक्षात येते. लोक आज बेकारी, वाढती इंधन दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या, देशातील बंद पडलेले हजारो उद्योग या विषयावरून सरकारला सातत्याने घेरत आहेत. त्या बाबींवरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठीच जेटली असे भलते विषय उपस्थित करून कॉंग्रेस व अन्य विरोधी पक्षांवर कुरघोड्या करताना दिसतात.

जेटली हे देशातले आत्तापर्यंतचे एकमकेव असे अर्थमंत्री आहेत की ते स्वत:च्या खात्याविषयी फारच कमी बोलतात. त्याऐवजी भलत्याच विषयावरील राजकारणात त्यांना स्वारस्य असते. आपल्या मंत्रालयाच्या कामकाजावर किंवा अपयशावर चर्चा करण्याची संधीच विरोधकांना मिळू द्यायची नाही आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या टीकेला उत्तर द्यायचे टाळून मूळ विषय दुसरीकडेच वळवायचा असा त्यांचा अट्टाहास असतो. आणि गेली चार वर्षे त्यांनी अशाच पद्धतीने कामकाज केले आहे. जेटलींना देशाचे अर्थकारण परिणामकारपणे हाताळणे जमलेले नाही. त्यांना ना महागाईवर नियंत्रण मिळवता आले ना जीएसटी, नोटबंदीची परिणामकारक अंमलबजावणी करता आली. त्यांना ना कृषी क्षेत्रासाठी भरघोस तरतूद करता आली, ना उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवता आल्या.

देशातील सर्वात अपयशी अर्थमंत्री म्हणून जेटलींची ओळख निर्माण झाली आहे. बॅंकांच्या बुडित कर्जाचे प्रमाण गेल्या चार वर्षात 12 लाख कोटी रूपयांनी वाढले पण जेटलींवर त्याचा काडीचाही परिणाम झालेला दिसला नाही. देशापुढील आर्थिक समस्या अत्यंत उग्र स्वरूप धारण करीत असताना जेटली मात्र न्याय व्यवस्थेत मागच्या काळात कॉंग्रेसने कसा हस्तक्षेप केला वगैरे निरर्थक बाबी लोकांना फेसबुकवरून ऐकवताना दिसतात. हा शुद्ध फाजीलपणा आहे. स्वत:चे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रकार आहे. मोदी सरकारला आज देशाच्या खराब आर्थिक स्थितीमुळे मान खाली घालावी लागली आहे. त्यामुळे बेटी बचाव आणि जनधनचा जप करून सरकारला हे अपयश झाकून न्यावे लागत आहे. सरकारच्या या अपयशाची जबाबदारी अर्थमंत्री म्हणून जेटलींनाही स्वीकारावी लागणार आहे. देशाचे बहुतांशी मुलभूत

अर्थकारण हे कच्चा तेलाच्या भावाशी निगडीत असते. त्या बाबतीत मोदी सरकारला अत्यंत अनुकुल पार्श्‍वभूमी लाभली होती. कच्चा तेलाचे भाव चक्क 22 डॉलर्स पर्यंत खाली आले होते. एखाद्या निष्णात अर्थमंत्र्यांनी त्याचा अर्थकारणासाठी कुशलतेने वापर करून देशाची अर्थव्यवस्था सुरक्षित स्थितीत नेऊन ठेवली असती, पण जेटली नावाच्या वाचाळवीराला ते काही करता आले नाही. मोदी सरकारवर होत असलेल्या टीकेला वकिली थाटात उत्तरे देऊन विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न करणे एवढेच काम त्यांना गेल्या चार वर्षात जमू शकले आहे, अन्यथा हा पुर्णपणे कुचकामी ठरलेला अर्थमंत्री आहे. त्यांच्या मंत्रालयाकडून नोटबंदी आणि जीएसटीची इतकी गचाळ अंमलबजावणी केली गेली की या दोन्ही बाबतीत सरकारला दर दिवशी नवीन नियम आणि नवीन परिपत्रके काढून वेळोवेळी बदल करावा लागला आहे. लोकांची त्यातून पळापळ झाली, त्यांची दिशाभूल आणि फसवणूक झाली. आजही हे दोन्ही विषय तसे अर्धवट अवस्थेतच लटकून आहेत. हे जेटलींचेच अपयश आहे. विरोधक केवळ मोदींनाच टार्गेट करीत असल्याने जेटलींचे अपयश झाकले जात आहे. पण मोदींच्या अपयशाला जेटलीही तितकेच कारणीभूत धरले पाहिजेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)