निरंतर अभ्यास यशाची गुरुकिल्ली!

पिंपरी – जगामध्ये अनेक असाध्य, अशक्‍य वाटणाऱ्या गोष्टी या निरंतर अभ्यासाने सहज साध्य होत असतात. विद्यार्थी जीवनात अभ्यासातील अखंड साधना हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत बालकीर्तनकार ह.भ.प. बाळकृष्ण डांगे महाराज यांनी व्यक्‍त केले. यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य सतीश गवळी, पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, पालक संघ उपाध्यक्षा रेखा धामणे, सचिव सीताराम शिंदे उपस्थित होते. बालकीर्तनकार बाळकृष्ण डांगे स्वतः यावर्षी दहावीची परीक्षा देणार आहेत, यामुळे अभ्यास तंत्रातील महत्वाचे कानमंत्र त्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना दिले. तसेच विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातल्याने त्यांचे व्याख्यान बहरत गेले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते म्हणाले, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज कोणत्याही शाळेत शिकायला गेले नव्हते. मात्र त्यांचा उपदेश, मार्गदर्शनाचा अभ्यास आज सर्वत्र केला जातो. अभ्यासाचे आणि सरावाचे महत्व सांगताना “असाध्य ते साध्य करीत अभ्यास तुका म्हणे’ या अभंगाच्या ओवीची आठवण करून दिली. आज शिक्षकांनी देखील मुलांमध्ये बसून, मुलांना समजेल, मुलांना रुचेल अशा सोप्या पद्धतीने अध्यापन करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

माऊलींचे गुरुत्वाकर्षण, तुकोबारायांचे अणू-रेणू
महाराष्ट्रातील संत परंपरा किती प्रगत आणि विज्ञानाची कास धरणारी होती हे सांगताना अभंगाचा आधार देत बालकीर्तनकार म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी सातशे वर्षांपूर्वी गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख ज्ञानेश्वरीत केला तर संत तुकाराम महाराजांनी साडे चारशे वर्षांपूर्वी गाथेत अणू-रेणूचा उल्लेख केला आहे. असा अभ्यासाचा ध्यास आपण विद्यार्थ्यांनी घेतल्यास आपणास देखील अतुलनीय यश प्राप्त होऊ शकेल असे ते म्हणाले.
शेवटी प्राचार्य सतीश गवळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल नवलपुरे , तर आभार शाळेच्या पर्यवेक्षिका सुमती पाटसकर यांनी मानले.संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्रा.जोत्स्ना एकबोटे यांनी कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)