कालवा फुटीप्रकरण : नियोजनाचा ‘चिखल’; बैठकांचा ‘गाळ’

गहु, तांदळावरच बोळवण


आपद्‌ग्रस्तांचे हाल : धान्य वाटपानंतर नेते, अधिकारी सगळेच गायब

-Ads-

पुणे – मुठा कालवा फुटून दांडेकर पूल वसाहतीमधील तब्बल 700 हून अधिक घरांत पाणी घुसले, तर 98 घरे वाहून गेली. याला 8 दिवस झाले, तरी या आपद्‌ग्रस्तांना फक्‍त 10 किलो गहू आणि तांदूळ देऊन शासकीय यंत्रणांनी त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे. “आठ दिवसांपासून मदतीचे कोटी रुपयांचे आकडेच ऐकायला मिळत आहेत. आम्हला मुदत कधी मिळणार,’ असा सवाल हे नागरिक उपस्थित करत आहेत.

संसार उघड्यावर; नजरा मदतीकडे
दांडेकर पूल परिसरातील घर वाहून गेलेली 98 कुटूंबे घर बांधकामासाठी शासन मदत करेल, या आशेवर अजूनही आहेत. आठ दिवसांपासून पावसाचा मार सहन करत लहान मुले आणि ज्येष्ठांना सोबत घेऊन उघड्यावरच संसार सुरू आहे. नेते आणि अधिकाऱ्यांनीही फिरकने बंदच केल्याने नागरिकांना मदतीसाठी शासकीय कार्यालयांची पायरी झिजविण्याची वेळ आली आहे. या नागरिकांना रेशनिंगवर देण्यात आला गहू आणि तांदूळही निकृष्ट असल्याच्या तक्रारी महिलांनी केल्या आहेत.

ज्याच्याकडे गाठीला काही रक्कम होती आणि नातेवाईकांनी मदत केली त्यांनी संसार उभारणे सुरू केले आहे. मात्र, ज्याचे घरच वाहून गेले; ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांचे डोळे लागले आहेत. घर बांधणी आणि साहित्य घेण्यासाठी जवळपास 5 ते 10 लाख रुपयांची गरज आहे. मात्र, एवढे पैसे कोणाकडेच नाहीत. पैसे किती द्यायचे, हेच शासकीय स्तरावर निश्‍चित होत नसल्याने हे लोक हतबल आहेत. घर बांधले आणि शासनाने नंतर साहित्य दिले, तर आहे ते पैसे वाया जातील. घर बांधले, तर तेवढा खर्च शासन देणार का? याची शाश्‍वती नाही. त्यामुळे ही कुटूंबे अजूनही वाऱ्यावरच आहेत.

…तर मदत मिळणार नाही, म्हणून काम थांबविले
या वसाहतीत असलेल्या प्रत्येक घरातील सदस्य मोलमजुरी करतो. तर, अनेक महिला चिमुकल्यांसह एकट्या राहून कुटूंबाचे पोट भरतात. मात्र, आता पंचनामा झाल्याने मदतीसाठी कोणी आले आणि आपण घरी सापडलो नाही, तर मदत मिळणार नाही. या भीतीपोटी या महिला आठ दिवसांपासून कामावर जात नसल्याने त्यांना मिळणारा उत्पन्नाचा एकमेव स्रोतही बंदच असून या महिला शेजारी राहून आपला दिवस काढत आहेत.

घरे लागली खचायला
ज्या घरामध्ये पाणी शिरले, ती घरे खचणे सुरू झाले आहे. ज्यांची घरे बचावली, त्यांच्या भिंतींना तडे जात असून फरशा खचल्या आहेत. अनेक ठिकाणच्या पत्र्यांना दिलेले लाकडी आधारही तुटू लागण्याने घरे ढासळ्याची भीती आहे. गेल्या आठ दिवसांपासून पालिकेने या भागातील ड्रेनेजही स्वच्छ केलेले नाहीत. तसेच या नागरिकांना नवीन नळकोंडाळीही दिलेली नाहीत. या परिसरात आरोग्य विभागाने घटनेनंतर एकदाच औषध फवारणी केली. त्यानंतर या भागात घरटी एका माणसाला “व्हायरल’चा त्रास सुरू झाला आहे.

माझे आणि भावाचे घर पडले आहे. आम्हला राहण्यास जागा नाही. मी शिवणकाम करते. पण, आता ते काम सोडून मी घरी आहे. घटनेनंतर किमान काही लोक भेटायला येऊन मदत मिळेल, असे सांगत आहेत. मात्र, आता दोन दिवस कोणीच फिरकलेही नाही. त्यामुळे मुलांना घेऊन दिवसभर पडक्‍या घराजवळच मदतीची वाट पाहत थांबावे लागते. तर जेथे आमची व्यवस्था केली आहे, त्तेथे काहीच सुविधा नाही.

– विद्या राव, कालवा आपत्तीग्रस्त.


आमचा संसार वाहून गेला आहे. घरात मी एकटीच कमावती आहे. मात्र, मदत मिळणार म्हणून दिवसभर आम्ही घरापाशीच थांबतो. मुलांचे शालेय साहित्य, स्वयंपाकाचे साहित्य सगळे काही वाहून गेले आहे. आम्हाला दोन दिवसांत ‘सीएसआर’ मधून सिलिंडर देऊ असे सांगण्यात आले. म्हणून आम्ही गॅस पुरवठादाराकडे गेलो. नवीन कनेक्‍शनसाठी साडेपाच हजार रु. द्या, अशी मागणी त्यांनी केली. ही आमची थट्टाच आहे ना ?

– साधना बोरकर, कालवा आपत्तीग्रस्त

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)