सांगवी – आजारी माणसे, गर्भवती स्त्रिया व विद्यार्थी यांचा विचार करता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार ध्वनी प्रदुषणाबाबतचे नियम पाळणे सर्वांच्या फायद्याचे आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी ध्वनी प्रदूषण नियम पाळले पाहिजेत. नियम न पाळल्यास संबंधित मंडळ व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवणार आहे, असे प्रतिपादन परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील यांनी येथे केले.

गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची सभा काल रात्री येथील अय्यपा हॉलमध्ये घेण्यात आली. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वाकड विभाग सहाय्यक पोलीस आयुक्‍त श्रीधर जाधव, सांगवी पोलीस ठाण्याचे निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद गोकुळे, स्विकृत प्रभाग सदस्य महेश जगताप, अरूण पवार, रमेश काशिद व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

पोलीस उपायुक्‍त पाटील यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या शंकाचे निरसन केले. त्या म्हणाल्या, कोणताही धर्म वा जात यांच्यात द्वेष वाढणार नाही, याची काळजी घेऊन मंडळांनी देखावे सादर करावेत. मंडपात समई, कापूर यासारख्या ज्वालाग्रही पदार्थांची काळजी घेऊन तेथे आग विरोधी उपकरणही तयार ठेवावे. विसर्जन घाट तेथील विद्युत यंत्रणा, पार्किंग याची पाहणी केली आहे, परंतु त्याबाबत काही त्रूटी असल्यास कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून द्यावे. सेलिब्रेटी येणार असल्यास त्याची आगाऊ सूचना पोलिसांना द्यावी. महिला सेलिब्रेटी असेल तर मंडळांनी महिला स्वयंसेवक त्यांच्यासाठी नेमावेत. मोठ्या मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्याचे फुटेज विसर्जनानंतर पोलीस ठाण्यात पेन ड्राईव्हमध्ये द्यावे. असे न करणाऱ्या मंडळांना पुढच्या वर्षाची परवानगी देणार नाही, याचा आवर्जून उल्लेख पोलीस उपायुक्‍त नम्रता पाटील यांनी केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी सूूत्रसंचलन केले. पोलीस हवालदार गिरीश राऊत, जगदीश सोनवणे, संजय मराठे यांनी बैठकीचे नियोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)