नियम तोडणे पडणार “बाराच्या भावात’

वारंवार वाहतूक शिस्त मोडल्यास वाहन अडकवणार : सर्व दंड भरल्यावरच वाहनाची सुटका

पुणे – एखाद्या वाहनचालकाने दोन पेक्षा जास्त नियम मोडूनही त्याचा दंड भरलेला नसल्यास वाहतूक पोलीस त्याचे वाहन अडकवणार आहेत. त्याने पूर्ण दंड भरल्यानंतरच त्याचे वाहन सोडले जाईल. यामुळे नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारकच आहे. याबद्दल थेट पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुढाकार घेतला आहे.

पुणे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. पोलीस कर्मचारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, नागरिकांचे त्यांना हवे तसे सहकार्य मिळत नाही. अनेक वाहन चालकांना नियम मोडल्याचे सीसीटीव्हीत आढळल्याने तसेच प्रत्यक्षात ई-चलन देऊनही त्यांनी दंड भरलेला नाही. वाहतूक नियमभंग करुन दंड न भरणारे वाहनचालक पुन्हा प्रत्यक्षात वाहतुकीचे नियम मोडताना सापडल्यास त्यांचे वाहन अडकवले जाणार आहे. संबंधित व्यक्‍ती जोपर्यंत मागील आणि सध्याचा सर्व दंड भरत नाही, तोपर्यंत त्यांचे वाहन परत केले जाणार नाही. यामुळे नागरिकांनी नियम पाळावेत, नियम तोडताना ते आढळल्यास दंड भरल्याशिवाय त्यांना सोडले जाणार नाही, असे आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

… तर पासपोर्ट, पोलीस व्हेरिफिकेशनला अडचण
वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना पासपोर्ट तसेच नोकरीसाठी पोलीस व्हेरिफिकेशनला अडचण येणार आहे. त्यांना अतिरीक्त पोलीस व्हेरिफिकेशन करायला लावले जाणार आहे. यामुळे त्यांना पासपोर्ट मिळण्यास विलंब लागेल. तसेच नोकरीसाठीही तत्परतेने पोलीस व्हेरिफिकेशन प्रमाणपत्र मिळणार नाही.

150 पोलीस वाहतूक शाखेत
शहरातील वाहतूक नियमनासाठी सध्या वाहतूक शाखेत 900 कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, ही संख्या कमी पडत असल्याने आणखी दीडशे कर्मचारी वाहतूक शाखेला देण्यात येणार आहेत. यासाठी इतर शाखेतील कर्मचारी वाहतूक शाखेकडे वळवण्याचा विचार सुरू असल्याचेही डॉ. के. वेंकटेशम यांनी सांगिलते.

वाहतूक कर्मचाऱ्यास धक्का-बुक्की केल्यास दखलपात्र गुन्हा दाखल होणार 
मागील काही दिवसांपासून नियम मोडणाऱ्यांकडून वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ तसेच मारहाण होण्याचे प्रकार घडत आहेत. तर महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर यापुढे कोणत्याही वाहन चालकाने असे कृत्य केल्यास थेट दखलपात्र गुन्हा दाखल करुन त्याला अटककेले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)