नियमभंगामुळे राकेश बाबू, के. टी. इरफान यांची हकालपट्टी

राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत भारतावर नामुष्की

गोल्ड कोस्ट – बाकीचे भारतीय खेळाडू आपल्या चमकदार कामगिरीने देशाचे नाव उज्ज्वल करीत असतानाच भारताच्या राकेश बाबू आणि के. टी. इरफान या खेळाडूंची स्पर्धेच्या “नो नीडल पॉलिसी’चा भंग केल्याप्रकरणी हकालपट्टी करण्यात आली असून त्यांना तात्काळ ऑस्ट्रेलिया सोडण्यास सांगण्यात आले आहे. परिणामी हे दोघेही लगेचच भारतात परतले आहेत. भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाने या प्रकरणी चौकशी समितीची स्थापना केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात भारताने आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना 17 सुवर्णांसह 42 पदके कमावली आहेत. मात्र राकेश बाबू आणि इरफान यांच्यामुळे भारतावर नामुष्की ओढवली आहे. राकेश तिहेरी उडीत अंतिम फेरीसाठी पात्र ठरला, तर इरफानने 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत 13वे स्थान मिळविले. या दोघांवर उत्तेजक सेवनाचा कोणताही गुन्हा महासंघाकडून नोंदवण्यात आलेला नसला, तरी “नो नीडल पॉलिसी’चा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.

तत्पूर्वी भारतीय बॉक्‍सर्सच्या खोलीबाहेर न वापरलेली सिरिंज सापडली होती. त्यावर भारतीय पथकप्रमुख विक्रम सिंग यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. परंतु सिरिंजची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे भारतीय पथकाला संयोजकांकडून तंबी देण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी भारतीय पथकातील संघाचे मुख्य व्यवस्थापक नामदेव शिरगावकर, ऍथलेटिक्‍स व्यवस्थापक रविंदर चौधरी, दोन खेळाडू राकेश बाबू व के. टी. इरफान, तसेच पथकातील आणखीन एका सदस्याने नियमाचा भंग केल्याची माहिती राष्ट्रकुल महासंघाने दिली आहे.

   भारताकडून परस्परविरोधी प्रतिक्रिया

भारतीय ऍथेलेटिक्‍स महासंघ आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेने खेळाडूंवरील कारवाईवरून परस्परविरोधी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऍथलेटिक्‍स महासंघाने सांगितले की, संबंधित खेळाडूंवर चौकशीनंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल. तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने सांगितले की, राष्ट्रकुल महासंघाच्या खेळाडूंवरील कारवाईच्या विरोधात आम्ही सर्वोच्च क्रीडा लवादाचे दरवाजे ठोठावणार आहोत. दुसरीकडे या प्रकरणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संघाचे मुख्य व्यवस्थापक नामदेव शिरगावकर व ऍथलेटिक्‍स व्यवस्थापक रविंदर चौधरी यांनी सांगितले की, राष्ट्रकुल महासंघाने खेळाडूंच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाविरोधात आम्ही आमच्या उच्च अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असून त्यानंतर आम्ही त्या निर्णयाविरोधात अपील करणार आहोत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)