निमगाव म्हाळुंगीत दारू धंद्यावाल्याकडून शेतकऱ्यास मारहाण

शिक्रापूर- निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे गावठी दारू तयार करणाऱ्यास “आमच्या शेतामध्ये दारू लपवून ठेवत जाऊ नकोस’ असे म्हटल्याच्या कारणावरून दारू धंद्यावाल्याने शेतकऱ्यास मारहाण, शिवीगाळ, दमदाटी केली असल्याची घटना आज सकाळी घडली.
याबाबत शिवाजी बाजीराव भागवत (वय 31, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी अमोल शिवाजी चौगुले व चंद्रकांत शिवाजी चौगुले (दोघे राहणार निमगाव म्हाळुंगी ता. शिरूर) या दोघा सख्या भावांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. शिरूर तालुक्‍यामध्ये क्रांतिवीर प्रतिष्ठानच्या वतीने दारूबंदी आंदोलन सुरू असताना देखील शिरूर तालुक्‍यातील निमगाव म्हाळुंगी येथील शिवाजी बाजीराव भागवत या शेतकऱ्यास त्याच्या शेतामध्ये दारू लपवून ठेवण्यास विरोध केला. त्यामुळे येथील गावठी दारू निर्मिती करणारे अमोल चौगुले व चंद्रकांत चौगुले यांनी मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती व फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार निमगाव म्हाळुंगी येथील शिवाजी भागवत हे आज सकाळी त्यांच्या घराशेजारील जनावराच्या गोठ्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याची कुट्टी करत असताना अमोल व चंद्रकांत हे त्यांच्या शेतामध्ये दारूची कॅन लपवून ठेवत असल्याचे दिसले. त्यानंतर शिवाजी यांनी “तुम्ही आमच्या शेतात दारूची कॅन लपवून ठेवत जाऊ नका’ असे त्यांना म्हटले. यानंतर दोघांनी चिडून जाऊन शिवाजी भागवत यांना हाताने, लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. “पोलिसांत तक्रार केली, तर बघून घेऊ’ अशी धमकीदेखील दिली. घटनेची माहिती मिळताच क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत मारहाण झालेल्या नागरिकाची विचारपूस करत दारू व्यावसायिकावर कारवाईची मागणी केली. त्यावेळी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन शिक्रापूर पोलिसांनी दिले.

  • अन्यथा दारू दुकाने पेटवून देऊ -पाचंगे
    राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस यांच्या जबाबदाऱ्या एकमेकावर ढकलण्याच्या प्रकारामुळे दारू धंदेवाल्यांचे मनोधैर्य वाढले असून या दोन्ही यंत्रणा यांना जाणीवपूर्वक आर्थिक हितसंबंधातून पाठीशी घालतात, त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले सुरु झालेले आहेत. याची दखल पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस महासंचालकांनी घ्यावी. अन्यथा, नागरिकच आता विरोध घेतल्याशिवाय राहणार नाही, पोलीस खात्याच्या नियमाप्रमाणे संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बीट हवालदार, पोलीस पाटील, तलाठी यांच्यावर गुन्हे दाखल करणे गरजेचे आहे, अन्यथा एक एप्रिल नंतर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून दारू दुकाने पेटवून देणार असल्याचा इशारा शिरूर तालुका दारूबंदी आंदोलनाचे प्रणेते क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)