निधी अभावी नव्या अभ्यासक्रमावरील शिक्षक प्रशिक्षणे रद्द?

पहिली आठवीची प्रशिक्षणे रद्द तर दहावीची प्रशिक्षणेही बोर्डाच्या ऊसणवारीतून
पुणे,दि.27 – देशात अटल बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या सर्व शिक्षा अभियानाचे रुपांतर समग्र योजनेत करण्यात सध्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय व्यस्त असल्याने यंदा राज्यातील पहिली व आठवीची प्रशिक्षणे रद्द करावी लागली आहेत. प्रशिक्षणासाठी लागणारा निधीच आला नसल्याने ही प्रशिक्षणे रद्द केली गेली आहेत. तर इयत्ता दहावीसाठीचे प्रशिक्षणही बोर्डाकडून पैसे उसणे घेत पूर्ण करण्यात आले आहे.
कोणताही नवा अभ्यासक्रम आला की, त्यावर राज्य संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून राज्यातील शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते. नव्या अभ्यासक्रमात नेमके कोणते बदल झाले आहेत, कोणत्या विचाराने हा अभ्यासक्रम तयार केला आहे, तो कसा शिकवणे अपेक्षित आहे, परीक्षांची मुल्यमापन पध्दती कशी अपेक्षित आहे आदी सर्व बाबी या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना सांगण्यात येतात. तसेच नव्या अभ्यासक्रमाबाबत काही शंका असल्यास शिक्षकही त्यांच्या शंका तज्ज्ञ मार्गदर्शकांना, अभ्यासमंडळातील सदस्यांना विचारतात. त्यामुळे एकाच पध्दतीने राज्यभरात शिकवले जाते. मात्र यंदा शाळा सुरु होऊन पंधरा दिवस होत आले तरीही अद्याप ही प्रशिक्षणे सुरु झालेली नाहीत. याबाबत दैनिक प्रभातला सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रशिक्षणे 21 जूनपासून होणार असल्याचे निश्‍चित करण्यात आले होते, मात्र तोपर्यंत निधीच न आल्याने ही ठरविलेली इयत्ता पहिली तसेच आठवीच्या शिक्षकांची प्रशिक्षणे रद्द करावी लागली आहेत. तर यंदा दहावीचा अभ्यासक्रमही नव्याने आला असून त्यासाठीही प्रशिक्षणाची मोठी मागणी होत होती. त्यामुळे बोर्डाने यासाठी पैसे देत ही प्रशिक्षणे पूर्ण केली आहेत. हे पैसे बोर्डाने ऊसणवारीवर दिले आहेत. दरम्यान आता ही बाब लपविण्यासाठी की काय व्हर्च्युअल ट्रेनिंगचा विचार सुरु असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र जर व्हर्च्युअल ट्रेनिंगच द्यायचे होते तर अद्याप त्याचे वेळापत्रक का तयार झाले नाही असाही प्रश्‍न उपस्थित होतो आहे. दरम्यान याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ.सुनील मगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)