निघोज ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा

लाळगेवस्तीत अवैध नळजोड असल्याच्या तक्रारी
पारनेर – तालुक्‍यातील निघोज परिसरातील लाळगेवस्तीवर अवैध नळकनेक्‍शन मोठ्या प्रमाणात जोडण्यात आल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळेच अनेक दिवसांपासून नळाला पाणीपुरवठा होत नाही याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी लाळगे वस्तीवरील महिलांनी ग्रामपंचायतवर हंडा मोर्चा काढला.
मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही गेल्या अनेक दिवसांपासून नळपाणीपुरवठा होत नाही. बोगस कनेक्‍शन असणाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई करावी, पिण्यासाठी नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी महिलांनी केली. कुकडी पट्ट्यातील गावात पाणीटंचाई नसताना केवळ ढिसाळ कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. यामुळे हंडा मोर्चाचे हत्यार येथील महिलांना उपसावे लागले.
निघोज सोसायटीच्या माजी उपाध्यक्ष सविता तनपुरे यांच्यासह शेकडो महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या देत घोषणाबाजी केली. त्यानंतर महिलांच्या शिष्टमंडळाने सरपंच ठकाराम लंके यांची भेट घेतली. ग्रामपंचायत सदस्य मंगेश लाळगे, बाबाजी तनपुरे व ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांनी लाळगेवस्तीवर पिण्यासाठी पाणीपुरवठा होत नसल्याच्या समस्येचा पाढा वाचला.
लाळगेमळा वस्तीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाइपलाइनला सुमारे पन्नासपेक्षा जास्त बोगस कनेक्‍शन आहेत. यामुळेच लाळगेवस्तीवर पाणीपुरवठा होत नसल्याचे महिलांनी निदर्शनास आणले.
सरपंच लंके यांनी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. बोगस कनेक्‍शन घेणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल, लाळगेमळा येथे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन त्यांनी दिले. यानंतर हंडा मोर्चा मागे घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)