निघोजेतील महिंद्रा सीआयई कंपनीत तणाव

चाकण- चाकण औद्योगिक वसाहतीत कामगार त्यांच्या संघटना आणि व्यस्थापन-उद्योजक यांच्यातील संघर्ष वारंवार समोर येत असून काही कारखान्यांतील औद्योगिक अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे. अनेक बड्या कंपन्यांमधील कामगारांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन आणि व्यवस्थापनाशी असहकाराचे हत्यार उपसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वेतनवाढ कराराच्या मुद्‌द्‌यावरून चाकण एमआयडीसी मधील निघोजे (ता. खेड) येथील महिंद्रा सीआयई ऑटो लि. (फोर्जिंग डिव्हिजन) मध्ये सध्या चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले असून येथील कामगार कुठल्याही क्षणी कंपनीचे उत्पादन बंद पाडून आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
महिंद्रा सीआयई ऑटो लि. (फोर्जिंग डिव्हिजन) कंपनीत कामगारांचा वेतनवाढ कराराच्या मुद्‌द्‌यावर कधीही वादाचा भडका उडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून कामगार आणि व्यवस्थापनात सुरु असलेल्या वेतनवाढ कराराचा प्रश्‍न व्यवस्थापनाच्या आडमुठेपणामुळे प्रलंबित पडल्याचा आरोप संबंधित कंपनीच्या कामगारांनी केला असून महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ (इंटक) या संघटनेचे प्रदेश सचिव संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कंपनीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या बैठकीत जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलनाचा व उत्पादन प्रक्रिया ठप्प करण्याचा पवित्रा कामगार संघटनेकडून घेण्यात आला आहे. महिंद्रा सीआयई कंपनीच्या कामगारांनी सांगितले की, वेतनवाढ कराराची मुदत संपून सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र व्यवस्थापन जाणीवपूर्वक करार लांबविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कामगार आंदोलनाचे हत्यार उपसणार आहेत. कामगार संघटनेचे संजय कदम यांनी कंपनी व्यवस्थापनाला तत्काळ करार न झाल्यास आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला आहे.

  • औद्योगिक अस्वस्थता टोकाला –
    चाकण एमआयडीसीतील अनेक कंपन्यांमध्ये वेतनवाढ करार, प्रलंबित मागण्या, कामगारांचे निलंबन यावरून कामगार व्यवस्थापनात वाद सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बजाज ऑटो, केहीन फाय अशा बड्या कंपन्यांसह अनेक लहान-मोठ्या कंपन्यांत मागील अनेक वर्षांपासून कामगार आणि व्यवस्थापन यांच्यात अंतर्गत वाद धुमसत आहे. कंपन्या व कामगार संघटना यांच्यातील अंतर्गत संघर्ष, कामगारांची आक्रमकता व कंपनी व्यवस्थापनाची कणखर भूमिका यामुळे चाकण एमआयडीसीमध्ये औद्योगिक अस्वस्थतेचा प्रश्‍न सातत्याने ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)