निगडी हद्दीत 48 तासात दोन खून

पिंपरी – सेल्समनच्या खुनाचा उलगडा होत नाही तोच मोहननगर येथे 48 तासात दुसरा खून झाल्याची घटना निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

निगडी येथे शुक्रवारी (दि. 5) दुपारी तीनच्या सुमारास नंदू वसंत चव्हाण (रा. नवी सांगवी) या सेल्समनचा अजंठानगर येथे खून झाला होता. याप्रकरणी विल्सन उर्फ अविनाश पतीराज डेमेन्टि (वय-26, रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव), दीपक देवेंद्र गवळी (वय-18, रा. पिंपळे गुरव, नवी सांगवी) या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. नंदू चव्हाण याच्यासमवेत आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा विल्सन याला संशय होता. त्यातून विल्सनने नंदूचा काटा काढला. पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी विल्सन व त्याचा साथीदार दीपक याचा पाठलाग करून चिंबळी येथे शिताफीने ताब्यात घेतले.

दरम्यान, या प्रकरणाचा उलगडा होत नाही तोच मिलिंदनगर येथे रात्री झोपलेल्या तरुणाच्या डोक्‍यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. 7) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. तुकाराम शिंदे (वय-22, रा. मिलिंद नगर, निगडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा भाऊ सुरेश शिंदे हा देखील जखमी झाला आहे. तुकाराम आणि सुरेश मिलिंदनगर येथे भाड्याच्या खोलीत राहतात. शनिवारी ते आपल्या घरी झोपले असता रात्री अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तुकाराम याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर सुरेश याच्यावर उपचार सुरु आहेत. या दोन्ही घटनांमुळे निगडी पोलिसांची पुरती दमछाक झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)