“डीपीआर’ तयार : महापालिका आयुक्‍तांना सादर करणार

पिंपरी – सहा महिन्यांपासून केवळ चर्चेत असलेल्या मेट्रोला निगडीपर्यंत नेण्याचा “डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प आराखडा) अखेर तयार झाला आहे. जुलै महिन्यात अपेक्षित असलेला हा “डीपीआर’ ऑगस्ट महिन्याच्या मध्यास तयार झाला आहे. पुढील काही दिवसांमध्येच “डीपीआर’ अधिकृतरित्या महापालिका आयुक्‍तांना सादर केला जाणार असून, त्यानंतरच मेट्रो निगडीपर्यंत धावण्याचा मार्ग प्रशस्त होणार आहे. दोन वर्षांपासून मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठीची मागणी आता पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे.

पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणारी मेट्रो आता एम्पायर पूल ओलांडून चिंचवडपर्यंत पोहचलीच आहे. आता पुढील पल्ला देखील गाठण्याच्या तयारीत महाराष्ट्र मेट्रो कार्पोरेशन लि. कंपनी आहे. पहिल्याच टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने मेट्रोला हा डीपीआर तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार मेट्रोने फ्रान्सची कंपनी सिस्ट्राकडून हा डीपीआर तयार करून घेतला आहे.

मेट्रोचे काम आता निगडी येथील भक्‍ती-शक्‍ती चौकापर्यंत सुमारे पाच किलो मीटरचा पुढील पल्ला मेट्रो गाठणार आहे. रिव्हर्सल अँड मेंटेनन्स फॅसिलिटीसाठी मेट्रोचा रुट भक्‍ती-शक्‍ती चौकापर्यंत या मार्गात निगडी येथे भक्‍ती-शक्‍ती चौक, आकुर्डी येथे खंडोबा माळ चौक, तर चिंचवड स्टेशन येथे मेट्रोचे स्थानक असणार आहे. परंतु मेट्रोचे निगडीपर्यंतच्या मार्गाच्या कामावर अद्याप महापालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकारची मोहर लागणे आवश्‍यक आहे. परंतु पुण्यामध्ये संरक्षण विभागाच्या हद्दीत मेट्रोच्या कामाला लागलेला ब्रेक पाहता मेट्रोला निगडीपर्यंत नेण्यास तातडीने मंजुरी मिळू शकते.

सुमारे 850 कोटी कंस्ट्रक्‍शन कॉस्ट
जमिनीवरुन धावणाऱ्या मेट्रोचा मार्ग तयार करण्यासाठी प्रत्येक किलो मीटरला सुमारे 250 कोटी खर्च येतो. परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोचे काम सुरू असल्याने इतर अतिरिक्‍त खर्च कमी होतील आणि सुमारे 850 कोटी रुपयांमध्ये मेट्रोचा हा मार्ग तयार होईल. या 850 कोटी रुपयांमध्ये अद्याप जमिनीची किंमत जोडण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)