निगडीत रंगली गायन, वादन, नृत्याची मैफल

पिंपरी – बहारदार सुगम संगीत गायन, त्याला संवादीनी, तबला वादनाची सुरेल साथ अन्‌ सोबतिला नृत्याचे पदलालित्य, अशा सुंदर मैफलीला रसिकांनी भरभरून दाद मिळाली. निमित्त होते, पिंपरी-चिंचवड महापालिका संगीत अकादमीच्या वर्धापन दिनाचे.

निगडी, प्राधिकरणातील संत तुकाराम व्यापारी संकुलातील सभागृहात हा वर्धापन दिन सोहळा रंगला. प्रारंभी संगीत शिक्षक अनंता जगदाळे यांचे सुगम संगीत झाले. त्यानंतर प्रचिती शिरवळे, प्रतिक्षा केदारे, वैष्णवी गलांडे या विद्यार्थ्यांनी संवादिनी, तर समर्थ नेटके, प्रसाद भाग्यवंत यांनी तबलावादन पेश केले. सुनील तोंडे व सुवर्णा भोंडे यांनी सादर केलेल्या सुगम संगीताला रसिकांची वाहवा मिळविली. रेणूका भोंडे हिच्या शास्त्रीय गायनानंतर अनुराधा चौधरी, प्रथमेश चोपडे, हरिदास सावंत, हरिभाऊ आसतकर, रेवा सायकर, कावेरी भावे, रिमा कुलकर्णी यांनी सामुहिक हार्मोनियम वादन पेश केले.

निखिल वाघमारे याने तबला वादन केले. प्रसिद्ध नर्तक डॉ. पंडीत नंदकिशोर कपोते यांच्या कथककृत्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. अतिथी कलावंत सुनील अवचट यांच्या बासरी वादनाने सोहळ्याची सांगता झाली. समीर सूर्यवंशी यांनी या दोघांना तबलासाथ केली. महापौर नितीन काळजे, संगीत अकादमी मानद सल्लागार डॉ. नंदकिशोर कपोते, स्वरसागर महोत्सवाचे मुख्य संयोजक प्रवीण तुपे, नगरसेविका वैशाली काळभोर, प्रशासन अधिकारी गोळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)