निगडीतील विद्युत दाहिनी “मरणासन्न’

पिंपरी – दहा वर्षे वैधता असलेल्या निगडी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीला 16 वर्षे पुर्ण होवूनही वापर सुरू आहे. त्यामुळे मागील तीन वर्षात दाहिनी वारंवार बंद पडत असून महापालिकेकडून दुरुस्तीच्या नावाखाली खर्चाचा रतीब सुरु आहे. पाच महिन्यांपूर्वी दुरुस्ती होवूनही पुन्हा बिघाड झाल्याने दाहिनी आजपासून (दि. 15) अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

निगडीतील प्रभाग क्रमांक 13 मध्ये महापालिकेने अमरधाम या नावाने स्मशानभूमी उभारली आहे. यामध्ये 2002 साली विद्युत शवदाहिनी बसविण्यात आली आहे. मात्र, या विद्युत दाहिनीची वैधता 10 वर्षेच होती. परंतु, या विद्युत दाहिनीला 16 वर्षे पुर्ण झाली आहेत. ही दाहिनी धोकादायकरित्या सुरु आहे. त्यात वारंवार बिघाड होऊन ती बंद पडते. एक शव दहन केल्यानंतर ती पुन्हा चालू होण्यासाठी तासन्‌तास वाट पहावी लागते.

महापालिकेने 2017-18 मध्ये दोनदा विद्युत दाहिनीची दुरुस्ती केली होती. त्यानंतर 30 मे 2018 रोजी दाहिनीत पुन्हा बिघाड झाला. त्यावेळीही दुरुस्ती करुन महापालिकेने ही दाहिनी वापरासाठी खुली केली होती. परंतु, विद्युत दाहिनीतील हिटींग कॉईल खराब झाल्याने आजपासून पुन्हा दाहिनी बंद करण्यात आली आहे. फ क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागांतर्गत दाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याला आणखी किमान तीन आठवडे लागणार असल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

एकीकडे विद्युत दाहिनीला बिघाडाने ग्रासले असताना दुसरीकडे स्मशानभूमीचीही अवस्था बिकट आहे. निगडी गावठाण, यमुनानगर, सेक्‍टर क्रमांक 22, साईनाथनगर, प्राधिकरण, रुपीनगर, तळवडे गावठाण, त्रिवेणीनगर, संभाजीनगर, अंजठानगर, बिजलीनगर या भागातील नागरिकांकडून या स्मशानभूमीचा वापर होतो. मात्र, येथील सोई-सुविधांच्या अभावामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना नाहक मनःस्ताप सहन करावा लागतो. स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतींची दुरावस्था झाली आहे. स्मशानभूमीतील अंत्यविधीच्या ठिकाणी चौथऱ्यातील खड्ड्याचे ब्लॉक विखुरले आहेत. चौथऱ्याच्या संरक्षक जाळ्या तुटल्या आहेत. स्मशानभूमीतील स्वच्छतागृहाची दुरावस्था झाली आहे.

निगडी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीतील हिटींग कॉईल खराब झाली आहे. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे वीस दिवसांचा कालावधी लागू शकतो. ही विद्युत दाहिनी मुदतबाह्य झाली आहे. त्यामुळे दाहिनी बंद पडण्याची समस्या उद्भवत आहेत.
– प्रवीण घोडे, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, फ क्षेत्रीय कार्यालय


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)