निकृष्ट कामामुळे टेम्पो खचला

सांगवी – ऐन पावसाळ्यात रस्ते खोदले, बुजवले आणि आता पुन्हा खोदण्याचे काम चालू आहे. पाऊस आला म्हणून घाईघाईत काम उरकण्याच्या नादात पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगवी, पिंपळे-गुरव परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था करून ठेवली आहे. दैनिक “प्रभात’ ने यावर वारंवार वृत्त प्रकाशित केले होते की, ऐन पावसाळ्यात होत असलेल्या खोदकामाचा नागरिकांना पुढे त्रास होईल. आता तो त्रास सुरू झाला असून रस्त्याच्या कडेला चार चाकी वाहने खचू लागली आहेत. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भिती आहे.

पावसापूर्वी घाईघाईत खोदाई केलेल्या रस्त्याच्या साईड पट्ट्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे पावसामुळे चार चाकी वाहने खचत आहेत. त्यामुळे ही कामे दर्जेदार करावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमरसिंह आदियाल यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पावसात साईडपट्ट्या मोठ्या प्रमाणात खचल्या आहेत. दुचाकी, चार चाकी वाहनांना याचा अंदाज न आल्याने गाड्या रुतून बसण्याचे प्रकारही घडत आहेत. नागरीकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेने या खचलेल्या साईडपट्ट्यांवर फक्‍त खडी टाकली आहे. त्यामुळे चार चाकी गाड्या त्यामध्ये रुतून बसून अपघात होत आहेत. पिंपळे-गुरव परिसरात अजूनही सुरू असलेल्या कामांच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. कामे सुरू असलेले रस्ते हे रहदारीचे मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यावरून ट्रक, पीएमपी बस, शाळेच्या बस, कंटेनर अशी मोठी वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम झालेल्या साईडपट्ट्या खचत आहेत.

पिंपळे-गुरवमधील सृष्टी चौकानजीक टेम्पो अचानक खचल्याने अपघात होता होता वाचला. जवळच स्वीट होम असल्याने या ठिकाणी मोठी गर्दी असते. खचलेला टेम्पो पडला असता, तर जीवित हानी झाली असती. पावसात सुरू असलेल्या कामांमुळे ही स्थिती उद्भवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)