निकाल 

– हिमांशु

निकाल या शब्दाची सर्वांनाच धास्ती असते. मग तो निकाल शाळा-कॉलेजचा असो, स्पर्धा परीक्षेचा असो किंवा न्यायालयाचा असो. निवडणुकीच्या निकालाचं भय तर सर्वाधिक खतरनाक! जिथं मतदानाचा शेवटचा टप्पा आणि निकाल यात आठवडाभराचा कालावधी असतो, तिथल्या उमेदवारांना विचारा! निवडून आल्यास पाच वर्षे कशी पाच दिवसांसारखी सरतात. निकालाच्या दिवशी प्रत्येकजण पेपरातलं राशीभविष्य वाचतो. अगदी ज्योतिषावर विश्‍वास नसणारासुद्धा! खरं तर खेळात जशी हार-जीत असते, तशीच प्रत्येक क्षेत्रात असते आणि ती तितकीच खिलाडूपणे स्वीकारायला हवी. विशेषतः परीक्षेतल्या निकालाच्या बाबतीत ही सवय मुलांसह पालकांनी अंगीकारायला हवी.

कारण भरपूर अभ्यास करूनसुद्धा नापास होणारे महाभाग आहेत तसेच अजिबात अभ्यास न करता परीक्षेत अव्वल नंबर काढणारेही आहेत. आपल्याकडे परीक्षा घेतली जाते ती फक्त स्मरणशक्तीची. वर्षभरात शिकवलेलं पेपर लिहिताना किती आठवतं, एवढ्यावरच गुणदान होतं. कल्पनाशक्तीची परीक्षा घेण्याची सोय आपल्याकडे नाही. परंतु तरीही परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी टाकाऊ असल्याचा समज आपल्याकडे करून घेतला जातो. स्पर्धेचं युग म्हणून डोक्‍यावर ओझं ठेवून पोरांना शर्यतीत पळवायचं, आपल्या अपेक्षांचं ओझंही त्याच्यावर लादायचं आणि शाळेला सुटीतसुद्धा कलागुणांच्या विकासासाठी पैसे भरून शिबिरं लावायची, हे काही पालकांचं नित्यकर्मच. अशा पालकांसाठी निकालाचा दिवस फारच महत्त्वाचा.

मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात आशू नावाच्या मुलानं दहावीची परीक्षा दिली होती. नुकताच या परीक्षेचा निकालही जाहीर झाला. संपूर्ण राज्यात सात विद्यार्थ्यांनी नापास झाल्यामुळं आत्महत्या केल्या. त्या पार्श्‍वभूमीवर आशूच्या घरचं वातावरण काही वेगळंच होतं. आशू हाही नापास झालाय. पण त्याच्या वडिलांनी वेगळीच भूमिका घेतली. एखादा विद्यार्थी जेव्हा पास होतो, तेव्हा त्याच्या घरातील लोक मित्रांना पार्टी देतात; पेढे वाटतात. आशूच्या वडिलांनी मात्र तो नापास झाल्याप्रीत्यर्थ जंगी पार्टी दिली. या पार्टीला त्यांनी नातेवाइकांना आणि जवळच्या मित्रांना बोलावलं होतं. ही अत्यंत सकारात्मक भूमिका म्हणावी लागेल. “नापास होणं म्हणजे आयुष्य संपणं, असं मी मानणार नाही’, याचा हा बेधडक जाहीरनामाच मानावा लागेल. “पुढील वर्षी हीच परीक्षा आशूला द्यायची आहे आणि त्यासाठी त्याला प्रोत्साहन मिळावं, म्हणून आपण पार्टी देत आहोत’, असं त्यांनी सांगितलं. “बोर्डाची परीक्षा आयुष्यातली शेवटच्या परीक्षा नव्हे’, असा संदेश त्यांना या पार्टीतून द्यायचा होता. निकालाचा दिवस असा स्वीकारणं पालकांनी शिकायला हवं.

स्पर्धेचा बागुलबुवा करून काहीही फायदा नाही. ती तर असणारच. शिवाय निकालाचा आणि व्यवहाराचा संबंध असतोच असं नाही, हेही हळूहळू सगळ्यांना कळू लागलंय. आता केरळ हायकोर्टाच्या निकालाचं उदाहरण पाहा. दुचाकी चालवताना मोबाइल वापरला म्हणून पोलिसांनी एकाला दंड केला. त्याविरुद्ध त्यानं कोर्टात अपील केलं होतं. कोर्टानं सांगितलं, “गाडी चालवताना मोबाइलवर बोलायचं नाही’, असा कायदाच नाहीये. सबब दंड करता येणार नाही. गाडी चालवताना मोबाइल धोकादायक, हे निश्‍चित. पण कायदाच केलेला नाही. इथं कोण नापास झालं? सांगा!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)