निंबोडी ग्रामस्थांचा रास्तारोको 

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मृत विद्यार्थ्यांच्या परिवाराला पाच लाख रुपयांची मदत
नगर – नगर तालुक्‍यातील निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छत कोसळल्याने तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मुद्‌द्‌यावरून निंबोडी ग्रामस्थांनी आज नगर-जामखेड रोडवर सकाळी रास्तारोको आंदोलन सुरू केले.

मृत विद्यार्थ्यांच्या परिवाराला मदत मिळून उपचार सुरू असलेल्या विद्यार्थ्यांवर शासनाने उपचार करावेत, तसेच शाळेच्या वर्गखोल्या निकृष्ट पद्धतीने बांधणाऱ्या ठेकेदार, अधिकारी यांच्या कामकाजाची पूर्ण चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, आदी मागण्या यावेळी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्या. सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनात ग्रामस्थांनी घडलेल्या घटनेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली. यावेळी आ. शिवाजीराव कर्डिले, आ. राहुल जगताप, शिवसेनेचे नेते शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, संपत मस्के, सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, तहसीलदार सुधीर पाटील, आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी 9 वाजल्यापासून निंबोडी ग्रामस्थांनी शाळा अपघातप्रकरणी आंदोलन सुरू केले. नगर-जामखेड रोडवर सुरू करण्यात आलेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. मदत मिळाल्याशिवाय रास्तारोको आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिला. रास्तारोको आंदोलनाच्या वेळी निंबोडीचे स्थानिक ग्रामस्थ संतोष केदारे, मंगेश भोंगाडे, करण बेरड, विजय भोंगाडे, आदी स्थानिक युवकांनी तीव्र शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्‍त केल्या. त्यानंतर सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आ. कर्डिले, आ. राहुल जगताप यांचे आंदोलनस्थळी आगमन झाले.
ग्रामस्थांच्या भावना ऐकल्यानंतर आ. कर्डिले यांनी आपण याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे व ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांच्याशी संपर्क साधला असल्याचे ग्रामस्थांना सांगितले.

तसेच, आ. कर्डिले यांनी आंदोलनस्थळावरून भ्रमणध्वनीद्वारे ग्रामस्थ आणि शिक्षणमंत्री तावडे व ग्रामविकासमंत्री मुंडे यांच्याशी संवाद घडवला. भ्रमणध्वनीवरून ग्रामस्थांनी संवाद साधताना ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी या अपघाताची चौकशी लावण्यात येईल आणि संबंधित प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले. मृत विद्यार्थ्यांच्या परिवारात आणि ग्रामस्थांच्या दुःखात मी सामील असल्याचे मुंडे यांनी सांगतानाच पीडित परिवाराला तत्काळ मदत देण्याचीही ग्वाही दिली. असे आश्‍वासन दिल्यानंतर निंबोडी ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. दरम्यान, आंदोलन संपल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, अतिरिक्‍त कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक काळे आणि नगर तालुका पंचायत समितीचे बिडीओ वसंतराव गारुडकर यांनी निंबोडी शाळा पडझडप्रकरणी दुर्दैवाने मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मृत विद्यार्थ्यांच्या परिवाराला पाच लाख रुपयांची प्रत्येकी मदत करण्याचे सूतोवाच आ. कर्डिले यांनी केले आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांची जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी सांत्वनपर भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, राजेश परजणे, शिवाजीराव गाडे, प्रतापराव शेळके यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. बुधवार, दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे हे निंबोडी येथे भेट देणार असल्याचे वृत्त आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)