निंबळक बाह्यवळण रस्ता दुरुस्तीची मागणी

नगर – शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाल्याने दुरुस्तीचे काम रखडले असून, ऐन पावसाळ्यात असलेल्या मोठ्या खड्डयांनी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या बाह्यवळण (राज्य महामार्ग रस्ता क्र. 222) रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी निंबळक गटातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास शुक्रवार, दि. 21 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला.

बाह्यवळणचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्गासाठी झाल्यानंतर सिमेंटचा चार पदरी रस्ता होणार असल्याने दुरुस्तीसाठी पैसे वाया न घालवायची भूमिका घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी झटकली आहे. यासाठी निंबळक गटातील ग्रामस्थांनी दोन वेळा रास्तारोको व ठिय्या आंदोलन करून या विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. शहरातून जाणाऱ्या जड वाहतुकीचे प्रमाण कमी होऊन अपघात टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला. मात्र, एक ते दीड वर्षापासून या रस्त्याची मोठी दुरवस्था होऊन जागोजागी डांबर उखडून मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी अनेक अपघात होऊन अनेकांचे प्राण जात आहे. या रस्त्यावर वाहनचालकांना लुटण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या बाह्यवळण रस्त्याचे काम करण्यासाठी शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला मंजुरीचे पत्र दिले आहे. या रस्त्याच्या कामासाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले असून, सदर विभाग कुठल्याही प्रकारे दखल घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर मागणीचे निवेदन सहा. अधीक्षक अभियंता पी. डी. कोटकर यांना देऊन उपअभियंता घोडके, बडदे, कुलकर्णी यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी निंबळकचे मा. सरपंच विलास लामखडे, ग्रा.पं. सदस्य विलास होळकर, बाबा पगारे, अशोक शिंदे, अजय लामखडे, महादेव बडे, तौफिक पटेल, जगन्नाथ शिंदे, समीर पटेल, मुख्तार शेख, सद्दाम शेख, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)