ना सचिन ना सुबोध !

“ब्रॅन्ड ऍम्बेसिडर’ विनाच सुरू झाला पालिकेचा गणेशोत्सव

पुणे :  जगप्रसिध्द असलेल्या पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला 125 वर्षे पूर्ण होत असल्या निमित्ताने महापालिका प्रशासनाकडून शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला जात असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (दि.12) रोजी मोठया थाटामाटात करण्यात आले. मात्र, या महोत्सवासाठी “ब्रॅन्ड ऍम्बेसिडर’ म्हणून भाजपकडून चर्चा सुरू असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने अद्याप याबाबत महापालिकेस होकार कळविलेला नाही. तर सचिन कडून काहीच उत्तर न आल्याने महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांनी मागणी केल्यानुसार, महोत्सवाच्या नियोजकांनी अद्याप सुबोध भावेशीही चर्चा केलेली नाही. त्यामुळे हा महोत्सव “ब्रॅन्ड ऍम्बेसिडर’ विनाच सुरू झाला पालिकेचा गणेशोत्सव सुरू झाला आहे.
महापालिकेच्याअंदाजपत्रकात पुण्याच्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी सुमारे 2 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या निमित्ताने महापालिकेकडून संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्यात 3 हजार ढोलवादक तसेच एकाच वेळी 3 हजार मुलांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्याचा विश्‍वविक्रम असे कार्यक्रम होणार आहेत. त्यानुसार, या कार्यक्रमांसाठी ब्रॅन्ड ऍम्बेसिडर’ नेमण्याबाबतही निर्णय घेण्यात आला होता. तशी घोषणाही महापौर मुक्ता टिळक आणि सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी केली होती. भाजपकडून सचिन तेंडुलकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्याच वेळी महापालिकेतील विरोधी पक्षांनी तेंडुलकर यांच्याऐवजी कला क्षेत्राशी संबधित व्यक्तीची निवड करण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांच्याकडून अभिनेते सुबोध भावे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे आधी तेंडुलकर यांच्याशी चर्चा करून नंतरच पुढील निर्णय घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, महोत्सव सुरू झाला तरी अद्याप त्यावर काहीच निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

तेंडूलकरशी अजूनही चर्चा सुरूच ?
याबाबत बोलताना सभागृह नेते श्रीनाथ भिमाले म्हणाले की गणेशोत्सवासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्याशी संर्पक झालेला आहे. त्यासाठी स्वत: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला असून त्याबाबतचे महापालिकेचे विनंती पत्रही तेंडूलकर यांच्या पर्यंत पोहचले आहे. त्यांच्याकडून त्यासाठी सहमती दर्शविण्यात आली असली तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, हा महोत्सव संपण्यापूर्वी महापालिकेकडून विश्‍वविक्रम करण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी सचिन तेंडूलकर उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)