ना. रामराजे येताच खा. उदयनराजेंची एंट्री

साताऱ्याच्या रेस्ट हाउसमध्ये पुन्हा तणाव

सातारा – साताऱ्यातील राजेंतर्गत वाद शमण्याचे नाव घेत नसून रविवारी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे निंबाळकर रेस्ट हाउसवर धडकताच काही वेळातच खा. उदयनराजेंची आक्रमक स्टाईलने एंट्री झाली. सुदैवाने पोलिसांनी अगोदरच चोख बंदोबस्त ठेवत सतर्कता बाळगल्याने दोन्ही नेते आमने-सामने येवू शकले नाही.

सातारा नगरपालिका निवडणूक, लोणंद येथील सोना अलाइंज कंपनी अन आनेवाडी टोलनाक्‍याच्या निमित्ताने खा. उदयनराजे विरुद्ध ना. रामराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे टोकाच्या वादाला सुरुवात झाली. खा. उदयनराजे हे यापुर्वीही व नुकतेच फलटणला रघुनाथराजे आणि संजीवराजेंच्या बंगला परिसरात जावून आले. तर विश्वजितराजे यांनी त्यावर आम्हीही सन्मानाने साताऱ्याच्या जलमंदिरवर जावू शकतो असे सांगितले होते.तर ना. रामराजेंनी ही मागे रेस्ट हाऊसवर झालेला प्रकार आपण विसरलो नसून शिकार टप्प्यात आले की बाण सोडण्याचे विधान तर केलेच त्याच बरोबर दिल्लीला जाण्याची देखील अप्रत्यक्ष इच्छा व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी ना. रामराजे रेस्ट हाउसला आल्यानंतर नियमितप्रमाणे अजिंक्‍यतारा या सूट क्रमांक 1 मध्ये दाखल झाले. ना. रामराजे येणार असल्याची माहिती असल्याने पोलिसांनी ही सद्य घडामोडी समोर ठेवून अधिक व कडक बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान याच वेळी सोमवारी भारत बंदच्या निमित्ताने कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.आनंदराव पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व पदाधिकारी हे प्रतापगड या सूट क्रमांक 2 मध्ये चर्चा करून ना. रामराजे यांची भेट घेण्यासाठी गेले.

यानंतर काही मिनिटांमध्ये खा. उदयनराजेंची रेस्ट हाउस परिसरात वाहनांच्या ताफ्यासाहित एंट्री झाली. गाडीतून उतरताच ते रेस्ट हाऊसच्या पायऱ्या चढताना ज्या अजिंक्‍यतारा या सूट मध्ये ना. रामराजे बसलेले होते त्या सुटकडे बघत प्रतापगड या सूटमध्ये दाखल झाले. त्याठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना अधून मधून अजिंक्‍यतारा सूट मध्ये जाण्याचे बोलून दाखविले. मात्र सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या बाजूला ना. रामराजे हे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून रवाना झाले. या नंतर काही वेळाने खा. उदयनराजे देखील तेथून रवाना झाले. दरम्यान, रेस्ट हाऊसवर तब्बल पाऊण तास दोन्ही राजे एकाच वेळी आल्यामुळे मात्र पोलिसांवर चांगलाच मानसिक ताण निर्माण झाल्याचे दिसून आले.

 माझं बुकिंग करायचं होतं

रविवारी दुपारी रेस्ट हाउसवर येण्यापूर्वी खा. उदयनराजे हे सकाळीही ना. रामराजे नियमित थांबत असलेल्या अजिंक्‍यतारा या सूट क्रमांक 1 मध्ये थेट गेले होते. मात्र, खा. उदयनराजे त्याठिकाणी येण्यापूर्वीच ना. रामराजे त्या ठिकाणी येवून गेले होते परंतु त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी सामान हे सूट क्रमांक 1 मधील आतील दालनात ठेवत व त्या दालनाला लॉक लावून ते ना. रामराजें यांच्या समवेत बाहेर गेले होते. अशावेळी खा. उदयनराजे सकाळी रेस्ट हाऊसवर आले आणि थेट सूट क्रमांक 1 मध्ये आतील दालनापर्यंत गेले. त्यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी हा सूट ना. रामराजेंसाठी बुकिंग करण्यात आला असल्याचे विनंतीपूर्वक सांगितले. त्यावर खा. उदयनराजेंनी ह्या सुटचे मला ही बुकिंग करायचे होते असे सांगत कोटी केली व पुढील प्रतापगड या सूटमध्ये दाखल झाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)