… नाही तर नव्या खेळाडूंना संधी देऊ 

निवड समिती अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांचा इशारा 
नवी दिल्ली – भारतीय कसोटी क्रिकेट संघातील खेळाडू अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरत असतील, तर त्यांच्या जागी नवे चेहेरे शोधण्याची गरज असल्याचा इशारा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी दिला आहे.

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारताला 1-4 असा पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय निवड समितीने याची गंभीर दखल घेतली आहे. खेळाडूंना पुरेशी संधी देऊनही त्यांच्याकडून मनासारखी कामगिरी होत नसेल, तर आम्ही तरुण खेळाडूंचा विचार करू असा इशाराच निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी दिला आहे. ते एका वर्तमानपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

-Ads-

कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता टीम इंडियातील एकही फलंदाज इंग्लंड दौऱ्यात सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नाही. अखेरच्या कसोटीत लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावून भारताची प्रतिष्ठा काही प्रमाणात राखली. मात्र पुरेशी संधी देऊनही काही भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारताना दिसत नसल्यामुळे नजीकच्या भविष्यात आम्ही तरुण खेळाडूंना संधी देऊ, असे सूचक विधान प्रसाद यांनी केले आहे. याचसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतात होणाऱ्या काही सामन्यांमध्ये आणखी काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्‍यता असल्याचे संकेत प्रसाद यांनी दिले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या आगामी दौऱ्यापूर्वी खेळाडूंना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल, तसेच खेळाडूंना तेथील वातावरणाशी जुळवून घेता यावे याची काळजी घेतली जाईल, असे सांगून प्रसाद म्हणाले की, आगामी विश्‍वचषक स्पर्धाही केवळ आठ महिन्यांवर येऊन ठेपली असून त्यापूर्वी भारत 24 वन-डे सामने खेळणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही ब्लू प्रिंट तयार केली आहे. मागील अठरा महिने निवड समितीमध्ये केवळ तीनच सदस्य होते. आता गगन खोडा आणि जतिन परांजपे यांचा निवड समितीमध्ये समावेश करण्यात आल्याने सदस्यसंख्या पुन्हा पाचवर पोहोचली आहे. या नव्या सदस्यांचेही प्रसाद यांनी स्वागत केले.

इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवड करत असताना आम्ही तरुण खेळाडूंऐवजी अनुभवी खेळाडूंना संधी दिली. मात्र भारताच्या सलामीवीरांकडून अपेक्षित कामगिरी झालेली नाही. पुजारा, रहाणे यांच्यासारख्या खेळाडूंकडे कसोटी क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. इंग्लंड दौऱ्यात काही कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली, मात्र त्यांच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. प्रसाद यांनी भारताच्या फलंदाजांबद्दल नाराजी व्यक्‍त केली.

बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून प्रत्येक खेळाडूच्या फिटनेसबद्दल निवड समिती माहिती घेत असल्याचेही सांगून प्रसाद म्हणाले की, स्थानिक पातळीवरील क्रिकेट स्पर्धांमध्ये काही खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. कर्नाटकचा मयंक अग्रवाल यंदाच्या हंगामात चांगला खेळतो आहे. याचसाठी आम्ही त्याच्या प्रशिक्षकांना त्याला संघात जास्तीत जास्त संधी देण्याची विनंती केली आहे. त्याच्या कामगिरीवर निवड समितीची नजर आहेच, योग्य वेळ येताच त्याला संघात संधी मिळेल. प्रसाद यांचा रोख स्पष्ट असल्यामुळे निवड समिती प्रमुखांनी दिलेला इशारा भारतीय खेळाडू किती गांभीर्याने घेतात हे पाहावे लागणार आहे.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)