नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी नित्याचीच

प्रवासी वैतागले : पोलिसांकडून कारवाईचे कागदोपत्री सोपस्कार

वाकी- पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी ते चाकण दरम्यान गेल्या काही दिवसांपासून होत असलेली प्रचंड वाहतूककोंडी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने रस्त्यावरून हटण्यास तयार नाहीत. पोलीस अवैध प्रवासी वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई करण्याचे केवळ कागदोपत्री सोपस्कार करीत असल्याने वाहतूककोंडी “जैसे थे’ असल्याने येथील नागरिकांसह प्रवासी वैतागले आहेत.
पुणे-नाशिक या महामार्गावर चाकण येथील तळेगाव, आंबेठाण, माणिक चौकात अवैध प्रवासी वाहने मोकाटपणे रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने प्रवास करताना नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करताना चाकण नगरपरिषदेने अवैध वाहतूक चाकण परिसरात बंद करण्याचा ठराव केला होता. मात्र, अवैध प्रवासी वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई सुरू असल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून नावाला केला जात असल्याचा आरोप येथील नागरिकांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी ही वाहने रस्त्यावरून बंद केलेली नाहीत. त्यामुळे वाहतुकीचा गेल्या काही दिवसांपासून फज्जा उडाला आहे. चाकण भागात मोठी औद्योगिक वसाहत असल्याने शहरात कामगारांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रस्त्याने वाहने दामटणाऱ्यांची संख्या नको तेवढी झाली आहे. पुढे चाललेल्या वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात “सुपातील कधी जात्यात येतील’, याचा थांगपत्ता लागत नसल्याने अनेकजण रस्ते अपघातात बळी गेले आहेत. मात्र, यावर उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष खदखदत आहे.

  • अन्य जिल्ह्यातील वाहनचालकांचा समावेश
    चाकणमध्ये चाकण ते भोसरी, चाकण ते राजगुरुनगर, चाकण ते तळेगाव दरम्यान अवैध प्रवासी वाहने चालविणाऱ्या अन्य जिल्ह्यातील वाहनचालकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चाकण येथे वाहतूककोंडी वाढू लागली आहे. चाकण भागात
    वाहतूककोंडी होण्यासाठी अवैध वाहने रस्त्यात आडवी तिडवी कशाही पद्धतीने उभी करत असल्याचा आरोप सामान्य नागरिक करत आहेत. एखाद्या दुसऱ्या दिवशी झालेली कोंडी पुढे सुरळीत होते. मात्र, आता तसे काही होत नाही.
  • स्थानिक नागरिक सकार्य करीत नसून आरेरावीची भाषा वापरीत असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत आहेत. जर नागरिकांनी सहकार्य केले तर कोंडी सोडविण्यात मदत होणार आहे.
    – गोविंद पवार, हवालदार, वाहतूक शाखा, चाकण
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)