नाशिकच्या प्रज्ञा पाटीलचा विश्‍वविक्रम, केला लागोपाठ 103 तास योगा

– गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये झाली नोंद

नाशिक- नाशिक येथील प्रज्ञा पाटील यांनी तब्बल 103 तास सलगपणे योगासने करून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजता सलग योगासनांचं तासाचं काऊंटडाऊन संपल्यानंतर उपस्थित योगाप्रेमीनी एकच जल्लोष केला. आज सकाळी त्यांनी सलग योगासनांचे शंभर तास पार केले. मात्र तरीही न थांबता त्यांनी 103 तासाचा विक्रम पूर्ण करीत आपल्या या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नोंद केली. यावेळी गिनीज बुकचे प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

नाशिकच्या 48 वर्षीय योगा शिक्षिका प्रज्ञा पाटील यांनी सतत 100 तास योगा करून एक नवा इतिहास रचण्याचा संकल्प केला होता. यानुसार शुक्रवार दिनांक 16 जून रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांनी या योगा मॅरेथॉनला आरंभ केला. योगासनांची विविध आसने करीत त्यांनी रविवार दिनांक 18 रोजी दुपारी दीड वाजता तामिळनाडूच्या के.पी.रचना यांचा 57 तासाचा विक्रम मोडीत काढीत डॉ. व्ही.गणेशकरण यांचाही 69 तासाचा विक्रम त्याच दिवशी मोडीत काढला.

यावेळी आमदार देवयानी फरांदे, प्रा.डॉ.मीनाक्षी गवळी, उद्योजक अविनाश गोठी, रोहिणी नायडू भाजपाच्या शहर उपाध्यक्ष सोनल दगडे, संध्या शिरसाट, मनोरमा पाटील, दीपाली गवांदे, अश्विनी डोंगरे, मीनाक्षी अहेर, वंदना रकीबे, गौरव पाटील, गौरागी पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)