नावीन्यता निर्माण करणारा कलावंत इतरांपेक्षा वेगळा ठरतो

उस्ताद झाकीर हुसेन : पुलोत्सवांतर्गत पु. ल. स्मृती सन्मान प्रदान

पुणे – नावीन्यता निर्माण करणारा कलावंत इतरांपेक्षा वेगळा ठरतो. पुस्तकी ज्ञान आणि व्यासपीठावरील प्रत्यक्ष वादन या दोन्हीमुळे अनुभवात संपन्नता येते. आतापर्यंत असे अनेक तबला वादक होऊन गेले की, जे प्रसिद्धीच्या झोतात आले नाहीत. मात्र, त्यांच्या कल्पकतेने हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक गाणी अजरामर झाली, असे मत ज्येष्ठ तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांनी व्यक्त केले.

पुलोत्सवांतर्गत पु.लं. स्मृती सन्मान सोहळ्यात रविवारी ते बोलत होते. उस्ताद झाकीर हुसेन यांना ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते पु. ल. स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि 25 हजार रुपये असे या सन्मानाचे स्वरूप आहे. सन्मान प्रदान सोहळ्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी कला क्षेत्रातील विविध मुद्दयांवर भाष्य करत झाकीर हुसेन यांनी वैयक्तिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला.

ते म्हणाले, “मला माझ्या आईने वर्षभरासाठी तिच्या मैत्रिणीकडे ठेवले. त्यातून मी अभ्यासाकडे लक्ष देईन असेल तिला वाटले. पण, ज्यांच्याकडे वास्तव्यास होतो, त्या कथक नृत्यांगना होत्या. मी तिथे असल्याचा मलाच फायदा झाला. कारण त्यांचय सरावांना मी ताल द्यायला लागलो आणि माझा तबल्याचा अधिकच रियाझ झाला,’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

संगीत क्षेत्रात गुरू-शिष्याच्या नात्याला वेगळे महत्त्व आहे. मी माझ्या वडिलांसारखे तबला वादन करतो, या प्रतिक्रियेमुळे माझे गुरू असलेले वडिल अस्वस्थ झाले. कारण मी त्यांच्याप्रमाणे वादन न करता स्वतःचा वेगळा ठसा उमटविला पाहिजे, अशी त्यांची गुरू या नात्याने माझ्याकडून अपेक्षा होती. शिष्य हा गुरूपेक्षा नेहमी पुढे जाणारा असला पाहिजे. कारण शिष्य गुरूकडून जे जे आत्मसात करतो, त्यात नावीन्यता आणि ताजेपणा आणततो. त्यातूनच कला प्रवाही होत असते, असे त्यांनी सांगितले.

उस्ताद झाकीर हुसेन यांची आठवण सांगताना डॉ. जब्बार पटेल म्हणाले, “मुघल-ए-आझम’ मधील छोटा सलीमच्या निमित्ताने प्रेक्षकांनी एक अभिनेता गमावला. यावर उस्ताद म्हणाले, “मी मुघल-ए-आझमची ऑडिशन दिली होती. पण, त्यामध्ये फक्त माझा चेहरा पाहिला आणि दिलीप कुमार फक्त ओके म्हणाले. माझ्या वडिलांची आणि दिलीप कुमारांची ओळख असल्याने माझ्या वडिलांनी मी फक्त तबला वाजवेन, अभिनय करणार नाही’ असे सांगितले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)