नाविन्याचा शोध घेणारा शैक्षणिक शास्त्रज्ञ संदीप गुंड

अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया ।
चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः 

अज्ञानरूपी अंधकारातून ज्यांनी ज्ञानरूपी मार्गावर असंख्यांना आणले अशा सर्व गुरूंना नमस्कार केला पाहिजे. अशा नमस्कार करण्याच्या जागा जरी कमी होत असल्या तरी संदीप गुंड यांच्यासारखे ‘ज्ञानशील शिक्षक’ दीपस्तंभाप्रमाणे असंख्यांना मार्ग दाखविण्याचे कार्य करीत आहेत. संदीप यांच्यासारख्या असंख्य ज्ञानदानासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या शिक्षकांचा योग्य तो सन्मान केला पाहिजे. रूळलेल्या वाटेवरून चालत उज्ज्वल भविष्याच्या शोधात वाटचाल करण्यापेक्षा आपण आपल्या क्षमतेला न्याय देणाऱ्या क्षेत्रात काम करू असा विचार एक तरुण मनाने केला. घरची परिस्थिती बेताची असल्याकारणाने मोठी स्वप्ने पाहतानाही मर्यादा येत असत.

काहीही झाले तर आपल्याकडे एखादा विषय पटवून सांगण्याची कला उपजत आहे. या कलेला न्याय देण्यासाठी शिक्षक म्हणून आपण अधिक काम करू शकू हे संदीप यांच्या मनाने हेरले. तत्कालीन परिस्थितीमध्ये नोकरी मिळणे हीच मोठी गोष्ट होती. त्यात 2009 मध्ये संदीप यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरी लागली. त्यावेळी नोकरी मिळणे म्हणजे शब्दातीत आनंद!

शिक्षण अधिक विद्यार्थी केंद्रित कसे होईल यासाठी संदीप सातत्यपूर्ण मेहनत घेत, प्रयोग करीत, तंत्रज्ञानाचा अधिक वापर करीत 24×7 कार्यरत असतात. शाळा हीच माझी खरी प्रयोगशाळा आहे म्हणत संदीप यांनी महाराष्ट्रातील पहिली डिजिटल शाळा ठाणे जिल्ह्यातील पाष्टेपाडा येथे सुरू केली. पाष्टेपाडा येथील डिजिटल शाळेची कथा अत्यंत प्रेरणादायी आहे. ठाणे जिल्ह्यातील हा भाग आदिवासी बहुल असलेला. या गावात आणि शाळेत विजेची धड सोय नाही की येथे जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. कोणतीही प्राथमिक सुविधा नसलेल्या या गावी संदीप यांना शिक्षक म्हणून नोकरी लागली. असे म्हणतात की प्रतिकूल परिस्थितीमध्येच माणूस असामान्य असे कार्य करतो. हेच संदीप यांच्या बाबतीत पण झाले. पाष्टेपाडा येथे सुरूवातीला शिक्षणसेवक म्हणून रुजू झाल्यांनतर संदीप यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न होता की, विद्यार्थ्यांना शाळेत आणायचे कसे? तेथील मुलांसाठी डिजिटल विश्व म्हणजे पृथ्वीसोडून दुसऱ्या गृहावर राहायला जाण्यासारखे होते. कारण त्यांच्या शाळेत पहिल्यांदा टच स्क्रीन उपकरणे आले तेव्हा विद्यार्थी त्या उपकरणाला स्पर्श करायलासुद्धा भीत असत. हळूहळू त्यांच्या मनामध्ये तंत्रज्ञाबद्दल समज येत गेली. पटावर असणाऱ्या विद्यार्थी संखेच्या 100% विद्यार्थी शाळेत येऊ लागले. हे संदीप यांच्यासाठी खूप मोठे यश होते.

गावातील प्रत्येक व्यक्तीमधील कौशल्य ओळखून त्यांच्या मदतीने संदीप यांनी झिरो बजेट शाळा तयार केली. ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम राबवून त्यांनी लोकांकडून शाळेची अनेक कामे करून घेतली. असंख्य अडचणींवर मात करीत संदीप यांनी समाज आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने लोकसहभागातून जिल्हा परिषद पाष्टेपाडा ही पहिली डिजिटल शाळा तयार केली. या शाळेचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभर हजारो शाळा डिजिटल झाल्या.

संदीप हे आजही एक क्रियाशील शिक्षक म्हणून 24 तास नाविन्याच्या शोधात राहत आपल्याला अधिकात अधिक चांगले कसे निर्माण करता येईल याचा ध्यास घेत कार्यमग्न असतात. एक तरूण ते क्रियाशील शैक्षणिक शास्त्रज्ञ हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. या त्यांच्या प्रवासामध्ये विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिक, शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था, राज्य आणि केंद्र शासन यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

कसलेही तंत्रज्ञाचे शिक्षण झाले नसतानाही संदीप यांनी पाष्टेपाडा येथे डिजिटल शाळा बनवून खूप मोठी क्रांती केलेली आहे. संदीप सध्या फ्युचररिस्टीक क्‍लासरूमवरती खूप चांगल्याप्रकारे कार्य करीत आहेत. त्यांनी स्मार्ट लर्निंग स्पेस सेंटर या देशातील पहिल्या-वहिल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेची निर्मिती केली आहे. तसेच आयआर तंत्रज्ञानाच्या मदतीने कमीत-कमी खर्चात टीव्ही व प्रोजेक्‍टर इंटरएक्‍टिव करण्याचे तंत्र विकसित केले आहे.

संदीप यांचे काम वेगवेगळ्या पातळ्यांवर चालू आहे. मात्र, या सर्वांचा गाभा शिक्षण हेच आहे. आपण करीत असलेल्या कामांचा अधिक लोकांना फायदा व्हावा म्हणून ते समाज माध्यमांचा सकारात्मकपणे वापर करीत असतात. इंटरएक्‍टिव कीवोस्क, सोलर स्मार्ट लर्निंग संच, एनएफसी टोकींग बुक, डिजिटल लायब्ररी, स्मार्ट लर्निंग सेंटर स्पेस सेंटर इत्यादी संशोधनात्मक कामाचे त्यांना पेटंट मिळाले आहे. राज्य शासनाच्या मदतीने संदीप यांनी दीड लाखाहून अधिक शिक्षकांना डिजिटल शाळा बनविण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये डिजिटल शाळा संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

भारत सरकारच्या डिजिटल बोर्ड उपक्रमासाठी सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. तरूणांनी स्वतःला ओळखत, आपली आवड जपत ध्येयरूपी मार्गावरून चालत, आपली उपयोगिता सिद्ध करीत वाटचाल करावी. या प्रवासात नक्कीच लोक मदत करतात. असा मोलाचा सल्ला संदीप तरुणांना देतात.

– श्रीकांत येरूळे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)