नावाची पाटी आणि दानाची पेटी 

डॉ. न. म. जोशी 

गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातली. कराची गावातली. एक विख्यात उद्योगपती होते. खूप पैसा मिळवत आणि खूप दान करीत असत. मात्र, एका हातानं दिलेलं दुसऱ्या हाताला कळत नसे. कराची गावात एक इस्पितळ उभारलं जाणार होतं. त्यासाठी लोक पैसा गोळा करीत होते. अनेक लोक देतही होते. ज्या संस्थेनं हे इस्पितळ उभारणीचं ठरवलं होतं त्यांनी जाहीर केलं होतं, “जे लोक दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्‍कम देतील त्यांची नावं इस्पितळाच्या कोनशिलेवर कोरण्यात येतील.’

त्यामुळे अनेक लोकांनी दहा दहा हजार रुपये दिले. त्यांची नावं इस्पितळाच्या कोनशिलेवर कोरण्याची व्यवस्था झाली.
जमशेटजी मेहता हे या उद्योगपतीचे नाव. त्यांच्याकडे कार्यकर्ते मदतीसाठी गेले. त्यांना कार्यकर्त्यांनी माहितीपत्रक दिलं. जमशेटजी मेहता यांनी शांतपणे पत्रक वाचलं आणि मग त्यांनी त्या कार्यकर्त्यांना एक चेक दिला तो चेक होता नऊ हजार नऊशे एक्‍याण्णव रुपयांचा.

कार्यकर्ते म्हणाले…
“मेहतासाहेब, आणखी केवळ नऊ रुपयेच तुम्ही दिलेत तर तुमचं नाव इस्पितळाच्या कोनशिलेवर कोरलं जाईल.’
“मला नाव नको. म्हणूनच तुम्हाला नऊ रुपये कमी दिलेत.’
कार्यकर्ते आश्‍चर्यचकित झाले. ते थोडे नाराजही झाले. हा गृहस्थ विक्षिप्त आहे असं त्यांना वाटलं. पण चेक घेऊन ते चालले होते. एवढ्यात मेहताजी त्यांना म्हणाले…
“पुढील आठवड्यात पुन्हा या मी तुम्हाला आणखी काही देईन.”
पुढील आठवड्यात पुन्हा कार्यकर्ते गेले.

तेव्हाही मेहताजींन नऊ हजार नऊशे एक्‍याण्णव रुपयांचा चेक दिला. तेव्हा कार्यकर्ते पुन्हा म्हणाले… “आणखी नऊ रुपये दिलेत तर…’
“मित्रांनो मी नावासाठी काही करीत नाही. तसं कुणीही करू नये असं मला वाटतं. पण लोकांना सांगण्याचा मला अधिकार नाही. मी माझ्या तत्त्वाप्रमाणं वागतो.’
“पण साहेब.. एक कार्यकर्ता त्यांना अडवीत म्हणाला, “नावाची पाटी आणि दानाची पेटी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. दानाला नाव नसावं. आणि ज्या दानाला नाव आहे ते दानच नसावं, असे मी मानतो.’
मेहताशेठच्या या वक्‍तव्याने सर्वच कार्यकर्ते भारावून गेले.

कथाबोध 
समाजात दानशूर लोक आहेत. नाही असं नाही. पण आदर्श दानधर्म म्हणजे गुप्त दान! एका हातानं दिलेलं दुसऱ्या हाताला कळू नये असं दान हवं. जमशेटजींनी ही धारणा जोपासली होती. म्हणून त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा दान दिलं. पण दोन्ही वेळा नाव नाकारलं. जे दान नावाचा हव्यास करतं तिथं अहंकाराचा वास असतो. जे दान निर्विकल्प भावनेनं केलेलं असतं ते दान श्रेष्ठ दान होय. दानाच्या पेटीला नावाची पाटी असू नये हेच खरं!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)