नारायणगाव तमाशा पंढरीत 31 राहुट्यांचे झाले आगमन

यात्रा-जत्रांसाठी लोकनाटय तमाशा खेळांच्या सुपाऱ्यांची देवाण-घेवाण सुरू

नारायणगाव- महाराष्ट्राची पारंपरिक लोककला जोपासणाऱ्या नारायणगाव (ता. जुन्नर) येथील तमाशा पंढरीत 31 लोकनाट्य तमाशा फडांच्या राहुट्यांचे आगमन झाले आहे. येथील तमाशा पंढरीत राज्यातील कानाकोपऱ्यांतून ग्रामस्थ, स्थानिक पुढारी, पाटील, पंच, यात्रा उत्सव कमिटीचे प्रमुख यांची रेलचेल सुरू होणार आहे. राज्यात सुरू झालेल्या यात्रा-जत्रांसाठी लोकनाट्य तमाशा खेळांच्या सुपाऱ्यांची (बुकिंग) देवाण-घेवाण याठिकाणी सुरू असून, या तमाशा राहुट्यांचे वास्तव्य अक्षय तृतीयापर्यंत राहणार आहे, अशी माहिती नारायणगाव तमाशा पंढरीचे अध्यक्ष सरपंच योगेश पाटे आणि अखिल भारतीय मराठी तमाशा पंढरीचे अध्यक्ष अविष्कार मुळे, उपाध्यक्ष मोहित नारायणगावकर यांनी दिली.
पारंपरिक पध्दतीने लोकनाट्य तमाशाच्या खेळातून महाराष्ट्राची लोककला जोपासणाऱ्या तमाशा फडांच्या राहुट्‌यांचे आगमन नारायणगाव येथे झाले आहे. या राहुट्या नारायणगाव पंढरीतच उभाराव्यात यासाठी सरपंच योगेश पाटे व ग्रामस्थांच्या सहकार्याने नारायणगाव पंढरीत उभारण्यात येणाऱ्या तमाशा राहुटांची परंपरा कायम राहिली आहे. सर्व तमाशा फडमालकांनी एकत्रित येऊन तमाशा पंढरीचे अध्यक्षस्थान सरपंच पाटे यांना दिले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी नळकनेक्‍शन व विजेची सोय केलेली आहे. त्यामुळे तमाशा फड मालकांनी ग्रामपंचायतीचे विशेष आभार मानले आहे.

  • मीना नदीचा काढ राहुट्यांनी फुलला
    दरवर्षी नारायणगावचे ग्रामदैवत श्री क्षेत्र मुक्‍ताबाई आणि काळोबा देवस्थान या यात्रेचे औचित्य साधून राज्यातील नामांकित छोट्या-मध्यम व मोठ्या फडांचे मालक येथे राहुट्या (कार्यालय) उभारून आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात. दरवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात या राहुट्यांचे आगमन होते. माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या जागेत गेली अनेक वर्षे राहुट्या विनामुल्य उभारल्या जात होत्या. यंदाच्या वर्षी जागा उपलब्ध नसल्याने नारायणगाव येथील मीना नदीच्या पात्रालगत असलेल्या वेताळबाबा मंदिराजवळ असलेल्या शेतजमिनीत शेतकरी आशिष फुलसुंदर, सुरेश पवार, मारुती फुलसुंदर, शरद फुलसुंदर, गणेश गाडेकर यांच्या मालकीच्या सुमारे तीन एकर क्षेत्रात राहुट्यांची उभारणी करण्यात आलेली आहे.
  • सहभागी तमाशा फड
    स्व. विठाबाई नारायणगावकर, रघुवीर खेडकर, मंगला बनसोडे, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, मालती इनामदार, हरिभाऊ बढे यांसह शिवकन्या बढे नगरकर, राजेश गणेश सांगवीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, किरणकुमार ढवळपूरीकर, भिका-भिमा सांगवीकर, अंजलीराजे नाशिककर, संध्या माने, आनंद जळगावकर, काळू-बाळू लोकनाट्य तमाशा मंडळ, कुंदा पाटील पुणेकर, शांताबाई सम्रापूरकर, प्रकाश अहिरेकर, जगनकुमारसह हौसा वेळवंडकर, मनिषा सिध्देटेककर, बाळ आल्हाट नेतवडकर, छाया खिलारे, रामचंद्र वाडेकर, काळू-नामू येळवंडकर, स्वाती शेवगावंकर, वामन पाटोळे, दत्ता महाडिक पुणेकर, संभाजी सक्रापूरकर, सर्जेराव जाधव, ईश्‍वर पिंपरीकर.
  • दुष्काळाच्या सावटामुळे अनुदान मिळावे
    यावर्षी दुष्काळी परिस्थितीचा तमाशा बुकिंगवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्‍यता असल्याने या आचारसंहितेचाही तमाशा परवानगीसाठी त्रास होणार आहे. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये पाणी टंचाई असल्यामुळे यात्रा-उत्सव साधेपणाने साजरा करण्याकडे या गावांचा कल आहे, तसेच गेल्या तीन ते चार वर्षांपासून बैलगाडा शर्यती बंद असल्याने या बंदीचा परिणाम यात्रा उत्सव व तमाशा क्षेत्रावर झाला आहे. यासाठी शासनाने तमाशा फड मालक व कलावंताना यंदाच्या वर्षी अनुदान देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी तमाशा पंढरीचे अध्यक्ष अविष्कार मुळे, उपाध्यक्ष मोहित नारायणगावकर, तमाशा फड मालक संभाजीराजे जाधव, सचिव किरण ढवळपूरीकर, खजिनदार विशाल इनामदार यांनी केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)