नायलॉन मांजा जीवावर उठला

पिंपरी – पतंग उडवणे ही गोष्ट सध्या शहरात जीवघेणी ठरत आहे. नाशिकफाटा येथे रविवारी एका डॉक्‍टर तरुणीला आपला जीव गमवावा लागल्यामुळे ही बाब पुन्हा चर्चेत आली आहे. नायलॉन मांजामुळे शहरात जानेवारी ते ऑक्‍टोबर या नऊ महिन्याच्या कालावधीत तीन जीवघेणे अपघात झाले आहेत. यामध्ये अगदी दोन वर्षाच्या मुलांचाही समावेश आहे.

डॉ. कृपाली निकम (वय-26, रा. पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. निकम या पुण्यावरुन भोसरीच्या दिशेने जात असताना त्यांच्यासोबत हा अपघात झाला. त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या पाठीमागेच दुचाकीवर असलेल्या सिध्दार्थ बोरकावे यांनी इतरांना मदतीचे आवाहन केले. मात्र तब्ब्ल वीस मिनिटे त्यांना कोणीही मदत केली नाही. त्यामुळे निकम यांचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाला.

मांजामुळे जानेवारी 2018 मध्ये सलग दोन दिवसात काळेवाडी परिसरात दोन जीवघेणे अपघात घडले होते. यामध्ये दोन वर्षाचा हमजा खान हा चिमुकला त्याच्या वडिलांसोबत दुचाकीवरुन जात होता. यावेळी त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झाली. यावेळी त्याच्या आई-वडिलांनी तासाभरात तब्ब्ल पाच रुग्णालये पालथी घातली. शेवटी एका खासगी रुग्णालयात तब्बल 32 टाक्‍यांची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर अवघ्या दोन दिवसात दुचाकीवरुन जात असताना रंगनाथ बाळकृष्ण भुजबळ (रा. ज्योतिबा नगर, काळेवाडी) हे ज्येष्ठ नागरिक दुचाकीवरुन जात असताना तापकीर चौकात पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याला गुंडाळला. मांजा काढायचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताच्या अंगठ्यालाही जखम झाली. गळ्याला तीन तर अंगठ्याला सहा जखमा झाल्या. या दोघांचेही जीव थोडक्‍यात बचावले. वर्षाकाठी शेकडो पक्षी मांजामुळे जायबंदी होत आहेत.

बंदी असताना मांजा येतो कुठून?
राष्ट्रीय हरीत लवादाने चायनीज मांजावर बंदी आणावी अशी याचिका गुजरात उच्च न्यायालयासमोर 2014 मध्ये दाखल केली होती. त्याला गुजरातच्या काही व्यापाऱ्यांनी विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही बंदी कायम ठेवत 2017 मध्ये नायलॉन विक्रीवर पूर्णपणे बंदी आणली होती. चायनीज मांजा हा काचेचे लेपण असलेल्या नायलॉन, तंगुस अशा कृत्रिम धाग्यापासून बनवला जातो. नायलॉन मांजावर बंदी असताना अनेक दुकानांमधून खुलेआम मांजाची विक्री होत आहे. पुण्यात एका महिलेचा मांजाने बळी घेतला होता. त्यानंतर दुकानांवर छापेमारी करत कारवाई करण्यात आली होती. मात्र, ही कारवाई “नव्याचे नऊ दिवस’ ठरल्याने पुन्हा नायलॉन मांजा विक्री खुलेआम सुरु झाली. शासकीय यंत्रणांच्या निष्क्रीयतेने आणखी एका महिलेचा बळी घेतला आहे.

सध्या आपण मांज्यामुळे जखमी पक्षांना कात्रज येथे उपचारासाठी पाठवतो. वर्षाला शंभर ते दीडशे पक्षी पिंपरी-चिंचवडमध्ये जखमी होतात. तर कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात उपचारासाठी येणाऱ्या पक्षांची संख्या ही साडे तीनशे ते चारशे आहे. यामध्ये घार व कबुतरांचा जास्त समावेश असतो.
– डॉ. दीपक सावंत, अभिरक्षक, बहिणाबाई चौधरी उद्यान.

मांजामुळे अपघात झालेले रुग्ण हे शहरात जानेवारी ते एप्रिल या कालावधीतच येतात. रविवारी झालेल्या घटनेत देखील संबंधीत महिलेची गळ्यातील रक्तपुरवठा करणारी मुख्य रक्त वाहिनीच मांजामुळे कापली गेली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
– डॉ. मनोज देशमुख, अधिक्षक, वायसीएम रुग्णालय, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)