नायर यांनी स्वीकारला मुख्याधिकारीपदाचा कार्यभार 

संगमनेर – परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्राजित प्रभाकरण नायर यांनी संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. पंधरा वर्षांनंतर संगमनेर नगरपरिषदेचा कारभार पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्याच्या हातात गेला असून, नायर हे महिनाभर कामकाज पाहणार आहेत. यापूर्वी पदभार स्वीकारलेले आयएएस अधिकारी प्रवीण गेडाम यांचा कित्ता गिरवत ते शहर अतिक्रमणमुक्त करण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश काढत नायर यांना जामखेड नगरपालिकेत परिविक्षाधिन मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती दिली होती. मात्र त्यांनी तेथे पदभार घेण्यापूर्वीच नगरविकास खात्याच्या अपर सचिवांच्या आदेशावरुन 28 नोव्हेंबरला सुहास जगताप यांनी तेथील मुख्याधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली. त्यामुळे नायर यांना संगमनेर नगरपरिषदेत नियुक्ती देण्यात आली.

नायर यांना जामखेडचा पदभार घेऊ न देण्यात पालकमंत्री राम शिंदे यांचा हस्तक्षेप असल्याचे बोलले जाते. शिंदे यांची चार वर्षांची कारकिर्द बघता नायर यांच्यासारखा अधिकारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता होती. त्यामुळे नायर यांच्या आदेशात बदल केल्याची चर्चा सुरू आहे.

नायर यांच्या बदलीचे आदेश बुधवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाच वाजता नगरपरिषदेत पोहोचले. गेडाम यांच्यानंतर दुसरा अधिकारी महिनाभरासाठी संगमनेरात येत असल्याने पांढरपेशा अतिक्रमणधारकांत मोठी खळबळ उडाली आहे. तत्कालीन अधिकारी गेडाम यांनी महिनाभराच्या कालखंडात दबाव झुगारत संगमनेर शहर अतिक्रमणमुक्त करण्याची किमया केली होती.

अतिक्रमण आणि गेडाम असे समीकरणच या शहरात बनले आहे. त्यामुळेच नगरपरिषदेच्या एका सभेत नगरसेवकांनी मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांना शहरातील अतिक्रमण मोहिमेवेळी आम्हाला तुमच्यात गेडाम साहेब बघायचेत, असे उद्‌गार काढले होते. नायर यांनी नगरपरिषदेच्या इमारतीत प्रवेश करता कर्मचाऱ्यांत शिस्तीचे वारेच वाहू लागल्याचे दिसून आले. नायर यांचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी स्वागत केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)