नायगाव येथे काळभैरवनाथ जन्मसोहळा उत्साहात साजरा

नायगाव – पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील श्री क्षेत्र नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी मंदिरात राम नामाच्या गजरात ओम जो जो रे वटूबाळा, निज निज भैरीवेल्हाळा या गीताने पाळण्याची भक्तिमय वातावरणात सुरूवात झाली. सिद्धेश्वर महाराज की जय, नाथ साहेबांच चांगभलं या जयघोषाने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते. श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरीच्या मंदिरात श्री काळभैरवनाथ जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
काळभैरवनाथ अष्टमीनिमित्त सकाळी 7 वाजता श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची महापूजा करण्यात आली. देवस्थानचे पुजारी दिपक जगताप यांनी श्रींची आकर्षक पूजा बांधली. सकाळी 8 वाजता महाआरती करण्यात आली. मंदिरात सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या समाप्तीनिमित्त सकाळी ह. भ. प. सोपान महाराज सानप (हिंगोली) यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर उद्योगपती भानुदास टेकवडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अष्ठमीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
सायंकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ह. भ. प. रामदास महाराज कड यांनी काळभैरवनाथ अष्टमीची माहिती दिली. त्यानंतर चांदीच्या सजविलेल्या पाळण्यात उत्सवमूर्ती ठेवून श्री काळभैरवनाथ जन्म सोहळा संपन्न झाला. उत्सवमूर्ती सजविलेल्या पालखीतून, भाविकांसह ढोल-ताशांच्या गजरात ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिराबाहेर पडली. त्यानंतर पालखी मंदिरात विसावली. ट्रस्टच्या वतीने दर्शनबारी, पिण्याचे पाणी, आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांची सजावट आदि व्यवस्था करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे व्यवस्थापक राहुल कड यांनी दिली.
सप्ताह सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप मोरे यांनी सांगितले की, अखंड हरिनाम सप्ताहाचे हे 32वे वर्षे आहे. यावेळी ह. भ. प. नामदेव श्‍यामगावकर, सुधाकर महाराज वाघ, भरत महाराज जोगी, माधव महाराज रसाळ, निवृत्ती महाराज देशमुख, संजय महाराज पाचपोर, सोपान महाराज सानप आदि प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने झाली. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भाविकांना मंत्रमुग्ध केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)