नायगाव परिसरात दिवाळीनंतरच फुल उत्पादकांची दिवाळी

सणामध्ये शेतकरी फुले तोडण्यात असतात व्यस्त

नायगाव- नायगाव परिसरातील फुलांना दिवाळी व दसऱ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. पुरंदर तालुक्‍यातील माळशिरस, पोंढे, राजेवाडी, आंबळे, टेकवडी आदी भागात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन घेतले जाते. फुले लावण्यासाठी शेतकरी चैत्र महिन्यात तयारी सुरू करतात. या काळात फुलांना असलेली प्रचंड मागणी आणि फुले तोडण्यासाठी मजुरांचा असलेल्या अभावामुळे फूल उत्पादक शेतकरी दिवाळीचा सण विसरून कुटुंबासह 10 ते 12 दिवस शेतातच फुले तोडणीस मग्न असतो. फुलांचा हंगाम संपल्यानंतर शेतकरी दिवाळी साजरी करतात. दसरा आणि दिपावलीच्या सणांमध्ये फूल बाजारात अधिराज्य गाजवणाऱ्या राजा शेवंतीची तोडणी उरकल्यानंतर निवांत झालेल्या फुलउत्पादक शेतकऱ्यांची सध्या दिवाळी सुरू आहे.
पुरंदर तालुक्‍यात दरवर्षीच झेंडू, राजा शेवंती, कापरी, बिजली, पेपर व्हाईट इत्यादी फुले दरवर्षीच केली जातात. या फुलांचे उत्पादनही चांगले निघते. यामाध्यमातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतात. यामुळे अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळाले आहेत. पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागात तर प्रमुख पीक म्हणून राजा शेवंतीचे पीक घेण्यात येते. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पादन माळशिरस, टेकवडी व पोंढे या गावातून घेण्यात येते. पुरंदरच्या पश्‍चिम भागात बिजली, कापरी व झेंडुचे उत्पादन घेतले जाते.
दरवर्षीच दसरा व दिपावलीच्या तोंडावर फुलांना मागणी वाढते. यामुळे दसरा व दिवाळीच्या सणांवेळी फूल उत्पादक शेतकरी आपल्या शेतामध्ये फूल तोडणीचे काम करतात. तोडलेली फुले बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात हा दिनक्रम रोजच सुरू असतो. घरातील माणसे शेतात फुले तोडण्यात दंग असतात. आठ महिने पोटच्या पोराप्रमाणे संभाळलेली फुले दिवाळी सणात चांगला बाजारभाव मिळवतात. या फुलांच्या वरती शेतकऱ्यांचे वार्षिक गणीत अवलंबून असते. यामुळे दिवाळी उरकल्यानंतर फूल उत्पादक शेतकरी आपली दिवाळी साजरी करतात.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)