नामांतराचे राजकारण (अग्रलेख) 

देशात पुतळ्यांचे राजकारण सुरू झाल्यानंतर आता शहरांच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या नामांतराच्या राजकारणाने जोर पकडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे लोकार्पण केल्यानंतर सुरू झालेली चर्चा संपायच्या आतच आता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या राज्यातील काही शहरांची नावे बदलण्याचा घाट घातला आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने आता अस्मितेचे असे राजकारण रंगणार यात शंका नाही. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री यांगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नामकरण अयोध्या असे केल्यानंतर आता गुजरात सरकारनेही अहमदाबादचे नाव बदलण्याची तयारी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अहमदाबादचे नाव कर्णावती असे करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतची कायदेशीर प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिवाळीच्या मुहुर्तावर श्रीरामाच्या सर्वात उंच पुतळ्याची घोषणा करतील असे वाटत असतानाच त्यांनी हा शहरांच्या नामांतराचा आणि महत्त्वाच्या ठिकाणांच्या नामकरणाचा धक़्का दिला. फैजाबादचे अयोध्या असे नामांतर करतानाच अयोध्येत मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार असून त्याला राजा दशरथाचं नाव देण्यात येणार आहे आणि एका नवीन विमानतळाला प्रभू रामाचं नाव देणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केलं आहे. काही दिवसांपूर्वीच अलाहाबादचे प्रयागराज असे नामकरण करण्यात आले होते.त्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उर्दु बाजारचे हिंदी बाजार, हुमायूनपूरचे हनुमाननगर, इस्लामपूरचे इश्‍वरपूर,मिया बाझारचे माया बाझार, अलीनगरचे आर्यनगर असे नामांतर केले होते. येत्या काही दिवसांत आणखीही काही शहरांची नावे बदलली जाण्याची शक्‍यता आहे.

महाराष्ट्रातही औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि अलिबागचे श्रीपूर असे नामांतर करण्याची मागणी सतत होत असते. शिवसेना तर फार पूर्वीपासून या शहरांना याच नवीन नावांनी ओळखते. भाजप आणि शिवसेना यांचे हिंदुत्व लपलेले नसल्याने त्यांनी शहरांची सर्व मुस्लीम नावे बदलण्याची मागणी केली असेल तर त्यात वेगळे काही नाही. अर्थात, आपल्या देशात सत्ताधाऱ्यांना अशी सवयच आहे. आदित्यनाथ यांनीच हा कार्यक्रम सुरू केला आहे असे नाही. तर त्यापूर्वी मायावती यांनीही मुख्यमंत्रिपदावर असताना अनेक शहरांची नावे बदलली होती. अमेठी शहराचे नाव बदलून त्यांनी शाहूजीनगर असे केले होते. त्याशिवाय इतर काही शहरांची नावे बदलून बाबासाहेब नगर, रमाबाई नगर आणि काशीराम नगर अशीही केली होती. पण दुर्दैवाची बाब ही की मायावती यांची सत्ता गेल्यानंतर आणि अखिलेश यादव मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी पुन्हा पूर्वीचीच नावे प्रचारात आणली.

राजर्षी शाहू महराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांची नावे या शहरांना राहिली असती तर काय फरक पडला असता? फुले, शाहू आणि आंबेडकर या नेत्यांची नावे आपल्या भाषणात सतत घेणाऱ्या एकाही नेत्याला अखिलेश यांच्या या निर्णयाला विरोध करावासा वाटला नव्हता. भाजप सरकार ज्या शहरांची नावे बदलत आहे ती शहरे पूर्वी मुस्लीम आक्रमकांच्या नावेच ओळखली जात होती. आता उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर जर पूर्वीचीच नावे कायम ठेवण्याचा आग्रह झाला तर प्रचंड तणाव निर्माण होण्याची भीती आहे. किंबहुना विरोधी पक्षांना याच जाळ्यात अडकवण्यासाठी भाजपने ही नामांतराची खेळी केली असावी अशी शंका घ्यायला जागा आहे.

शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाई आंबेडकर यांची नावे बदलली तरीही पेटून न उठणारा समाज मुस्लीम नावे कायम ठेवली तर पेटून उठेल किंवा त्याला तसे भाग पाडले जाईल अशीच ही खेळी आहे. अयोध्या येथील राममंदिर हा भाजपचा नेहमीच प्रचाराचा आणि मतदारांच्या ध्रुवीकरणाचा मुद्दा राहिला आहे. पण मंदिराचा विषय आता न्यायालयाच्या अखत्यारीत गेल्याने तो विषय किती रेटावा याला काही मर्यादा आहेत. म्हणूनच तोपर्यंत शहरांची मुस्लीम नावे बदलण्याची रणनीती आता समोर आली आहे. ज्या गुजरातमध्ये आतापर्यंत नामांतराचा फारसा मुद्दा नव्हता त्या गुजरातमध्येही अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यात यावे ही लोकभावना असल्याचे सरकारला सांगावे लागत आहे यातच सारे काही आले. योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम नावांना जे पर्याय दिले आहेत ते थेटपणे हिंदुत्व दाखवणारे आहेत.

मायावती यांनी शहरांचे नामांतर करताना किमान देशातीलच थोर नेत्यांची नावे दिली होती आणि मुस्लीम नावे बदलणे त्यांनी कटाक्षाने टाळले होते. कानपूर आणि अमेठी यासारख्या शहरांची नावे त्यांनी बदलली होती. पण भाजप सरकार मुस्लीम नावांच्या शहरांना हिंदू देवांचीच नावे देऊन आपला अजेंडा स्पष्ट करीत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कदाचित ही रणनीती यशस्वी होईलही. पण ध्रुवीकरणामुळे समाजात जी दुही निर्माण होते त्याचे परिणाम भोगावे लागतील त्याचे काय करायचे याचे उत्तर सरकारकडे असणार आहे काय?

परदेशातही शहरे आणि विमानतळांना थोरपुरुषांची नावे असतात. पण त्यामागे अस्मितेचे राजकारण नसते आणि ज्याचे नाव दिले जाते तो नेता समाजाच्या सर्व थरांना मान्य असतो.तेथे थोर नेते विविध समाजगटात विभागले आणि वाटले गेलेले नाहीत. त्यामुळे तेथील नामांतराची आणि नामकरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडते. आपल्याकडे मात्र ही प्रक्रिया अनेकदा वादग्रस्त आणि हिंसकही ठरते. राजकारण आणि त्यातून होणारा फायदा हेच नामांतर आणि नामकरणामागील कारण असल्याने हे अपरिहार्यच मानावे लागते. म्हणूनच सध्या देशात नामकरणाचे राजकारण रंगत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)