नापिकीला कंटाळून लातूर जिल्ह्यात तीन दिवसात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या 

लातूर (प्रतिनिधी): लातूर जिल्ह्यात नापिकीला कंटाळून गेल्या 3 दिवसांमध्ये 3 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. शनिवारी सकाळी जिल्ह्यातील औसा तालुक्‍यातील हासेगाववाडी येथील 44 वर्षीय चंद्रकांत नागोराव साठे या अल्पभुधारक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेतला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, आई असा परिवार आहे. गुरुवारी लातूर तालुक्‍यातील मळवटी येथेही शेतकऱ्याच्या आत्महत्येची दुसरी घटना घडली होती.

चंद्रकांत नागोराव साठे यांच्याकडे 3 एकर कोरडवाहू शेत जमीन होती. सततची नापिकी आणि कर्जाचा डोंगर या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्याकडे श्रीराम फायनान्सचे अडीच लाख, तर स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपयांचे कर्ज होते. शिवाय पावसाअभावी खरीपातील एकही पीक त्यांच्या पदरी पडले नव्हते. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घटना घडूनही दुपारी 12 पर्यंत पंचनाम्यासाठी पोलीस व प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी घटनास्थळी फिरकलेच नव्हते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लातूर जिल्ह्यात शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले असून असे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीचे परिणाम जिल्ह्यात जाणवू लागले आहेत. पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील एकही पिक शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही, तर रब्बीतील पेरणीला अद्यापही सुरुवात झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)